जबलपूर : जगावरील तिसऱ्या महायुद्धाचा धोका अजूनही कायम आहे. या स्थितीत जागतिक शांतीसाठी संपूर्ण जगाची आशा आता भारतावर असल्याचे सांगून यात काही लोक अडथळे निर्माण करीत असल्याचे सरसंघचालक माेहन भागवत यांनी नमूद केले. भारत पुन्हा एकदा ‘विश्वगुरू’ होण्याच्या दिशेने वाटचाल करीत असल्याचेही ते म्हणाले. मध्य प्रदेशात जबलपूर येथे संघाच्या दिवंगत नेत्या डॉ. उर्मिला जामदार यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित समारंभात भागवत बोलत होते.
सध्या युक्रेन-रशिया युद्ध असो अथवा इस्रायल-हमास यांच्यातील संघर्ष असो, यातून तिसऱ्या महायुद्धाची लक्षणे दिसू लागली आहेत. हे महायुद्ध नेमके कुठून सुरू होईल हे इतक्यात स्पष्ट नसले तरी सध्या सुरू असलेल्या संघर्षांच्या क्षेत्रातूनच याची ठिणगी पडू शकते, असे भागवत म्हणाले. यावेळी सरसंघचालक भागवत यांनी विज्ञानात जगाने साधलेली प्रगती आणि शस्त्रास्त्रांच्या विकासावरही भाष्य केले.
मानवतेची सेवा हाच सनातन धर्ममानवतेची सेवा करणे हाच सनातन धर्म असून हेच हिंदुत्वातही असते. याच हिंदुत्वात जगाला मार्ग दाखवण्याचे सामर्थ्य असल्याचे भागवत म्हणाले. भारतीय ग्रंथांत लिखीत स्वरुपात मांडला जाण्याआधीच हिंदू शब्द अस्तित्वात आला होता. जनतेत जाहीरपणे या शब्दाचा वापर श्री गुरुनानक देवजींनी केला होता, असेही ते म्हणाले.
विज्ञानाच्या लाभापासून अजूनही गरीब वर्ग वंचित
विज्ञानाच्या क्षेत्रात जगाने खूप प्रगती केली; परंतु त्याचे लाभ अजूनही जगातील गरिबांपर्यंत पोहोचलेले नाहीत. दुसरीकडे जगाचा विनाश करणारी शस्त्रास्त्रे मात्र जागोजाग पोहोचत आहेत.
ग्रामीण भागात काही आजारांवरील औषधे भलेही मिळत नसतील, परंतु देशी कट्टा मात्र येथे सहज पोहचतो. एकीकडे ही स्थिती असताना पर्यावरणाकडील दुर्लक्षाकडेही त्यांनी लक्ष वेधले.