नवी दिल्ली : सगळ्या मुस्लिमांनी दहशतवादी बनावे, असे मी कधीही म्हणालो नाही, असे इस्लामचे प्रवचनकार डॉ. झकीर नाईक यांनी म्हटले आहे. नाईक यांच्या भाषणांमुळे आम्हाला प्रेरणा मिळाल्याचे ढाक्यामध्ये गेल्या आठवड्यात दहशतवादी हल्ला करणाऱ्यांनी म्हटल्याचे प्रसिद्ध झाल्यानंतर बुधवारी नाईक यांनी वरील दावा केला.आंतरराष्ट्रीय दहशतवादी ओसामा बिन लादेन याचे आपल्या एका भाषणात समर्थन केल्याबद्दल नाईक यांच्यावर सध्या जोरदार टीका होत आहे. ते म्हणाले, माझ्या या भाषणाच्या व्हिडीओमध्ये फेरफार करण्यात आला आहे. ‘‘कोणत्याही मुस्लिमाने मानवजातीला दहशत निर्माण करू नये. माझे म्हणणे चुकीच्या पद्धतीने याआधी मांडण्यात आले आहे. मी एवढेच म्हणालो की, मुस्लिमांनी समाजविरोधी तत्त्वांसाठी दहशतवादी बनावे. ओसामा लादेनसंदर्भातील माझ्या त्या व्हिडीओमध्ये भेसळ करण्यात आली,’’ असे नाईक यांनी मुलाखतीत म्हटले. अर्धाच भाग का सांगता?मी एवढेच म्हणालो होतो की, कुराणाच्या पाचव्या प्रकरणात असे स्पष्ट म्हटले आहे की, व्यक्ती कोणत्याही धर्माच्या व्यक्तीला ठार मारत असेल तर ती मानवतेची हत्याच असते आणि ठार मारल्या जात असलेल्या व्यक्तीला जो कोणी वाचवतो तो संपूर्ण मानवजातीला वाचवतो. प्रसारमाध्यमे माझ्या वक्तव्याचा अर्धाच भाग का सांगत आहेत?- झकीर नाईक
माझ्या भाषणाच्या व्हिडीओत छेडछाड
By admin | Published: July 08, 2016 1:22 AM