Tahawwur Rana: २६/११ मुंबई दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड तहव्वूर राणाला लवकरच भारतात आणण्याची शक्यता आहे. भारतात प्रत्यार्पणाला स्थगिती देण्याबाबत अमेरिकेच्या न्यायालयात केलेला अर्ज फेटाळण्यात आला आहे. यानंतर आता राणाच्या प्रत्यार्पणासाठी भारतातील अनेक तपास यंत्रणाची पथके अमेरिकेत दाखल झाली आहेत. लवकरच तहव्वूर राणाला भारतात आणले जाणार आहे. या पार्श्वभूमीवर भारतातील हालचालींना वेग आला आहे. भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतल्याची माहिती मिळाली आहे.
तहव्वूर राणाच्या भारतातील प्रत्यार्पणाबाबत गेल्या अनेक वर्षांपासून प्रयत्न सुरू होते. दीर्घ काळापासून भारत तहव्वूर राणाच्या प्रर्त्यापणाची मागणी करत होता. अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदी ट्रम्प यांच्या भेटीला गेले असता या दोन्ही नेत्यांच्या बैठकीत अमेरिकेने ही मागणी मान्य केली. परंतु, राणाने प्रत्यार्पणाविरोधात अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करत याला स्थगिती देण्याची मागणी केली होती. परंतु, ही याचिका फेटाळण्यात आली. आरोपी तहव्वूर राणा सध्या लॉस एंजेलिसच्या जेलमध्ये बंद आहे. त्याला भारतात आणणार असून त्या पार्श्वभूमीवर दिल्ली आणि मुंबईतील सुरक्षा वाढवण्यात आली आहे.
अजित डोवाल-जयशंकर यांनी घेतली अमित शाह यांची भेट
तहव्वूर राणाला भारतात आणण्याच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतील नॉर्थ ब्लॉक येथे असलेल्या गृह मंत्रालयाच्या कार्यालयात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांची एक महत्त्वाची बैठक पार पडली. ही बैठक सुमारे २२ मिनिटे चालल्याची माहिती मिळाली आहे. या बैठकीत तहव्वूर राणाचे प्रत्यार्पण आणि त्यासंदर्भातील राजकीय परिणामांबाबत चर्चा करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान, तहव्वूर राणा आयएसआय आणि लष्कर ए तोयबाचा सदस्य आहे. राणा हा डेविड हेडलीचा खास मानला जात होता. हल्ल्याअगोदर तहव्वूर आणि हेडली यांची अनेकदा बैठक झाली. डेविड हेडलीने अमेरिकन तपास यंत्रणेसमोर तहव्वूरचं नाव घेतले होते. हेडली मुंबई हल्ल्याआधीच भारतात आला होता. त्याने मुंबईतील ताज हॉटेल, लियोपोल्ड कॅफेसह अन्य प्रमुख जागांची रेकी केली होती. त्यानंतर आयएसआय आणि पाकिस्तानी सैन्याद्वारे प्रशिक्षण दिलेले लष्कर ए तोयबाचे दहशतवादी मुंबईत शिरले आणि त्यांनी ताज हॉटेलसह इतर ठिकाणांवर हल्ले केले. मुंबईतील दहशतवादी हल्ल्याबाबत तहव्वूरला आधीच माहिती होती. २००८ च्या दहशतवादी हल्ल्याच्या आरोपपत्रानुसार, २६ नोव्हेंबरच्या हल्ल्यापूर्वी मुंबईतील पवई इथल्या हॉटेलमध्ये २ दिवस राणा थांबला होता. ११ नोव्हेंबर २००८ रोजी तहव्वूर राणा भारतात आला, तो २१ नोव्हेंबरपर्यंत इथेच होता. त्यात २ दिवस मुंबईतील पवई भागात थांबला होता.