वाळूची रॉयल्टी न भरल्याने तापी महामंडळाचे ३ वाहने जप्त तहसीलदारांची कारवाई : सव्वा तीन कोटी रुपयांची थकबाकी
By admin | Published: February 23, 2016 12:03 AM
सोबत फोटो
सोबत फोटोजळगाव : तापी महामंडळामार्फत करण्यात आलेल्या विविध बांधकामांसाठी वापरण्यात आलेल्या वाळूच्या रॉयल्टीची रक्कम न भरल्याच्या कारणावरून तापी महामंडळातील अधिकार्यांची तीन वाहने सोमवारी तहसीलदार गोविंद शिंदे यांच्या पथकाने जप्त केली आहेत.तापी महामंडळातर्फे विविध प्रकल्पांचे कामे सुरु आहेत. यासाठी लागणारी वाळूची उचल केल्यानंतर रॉयल्टीची रक्कम भरणे आवश्यक आहे. मात्र गेल्या अनेक महिन्यांपासून ही रक्कम भरण्यात आलेली नाही. थकबाकीचा हा आकडा सव्वा तीन कोटींपर्यंत पोहचला आहे. काही दिवसांपूर्वी लेखापरिक्षण झाल्यानंतर त्यात वाळूच्या रॉयल्टीची वसुली का करण्यात आली नाही याबाबत लेखापरिक्षकांनी विचारणा केली होती. त्यानुसार जळगावचे तहसीलदार गोविंद शिंदे यांनी नायब तहसीलदार डी.एस.भालेराव, जळगाव सर्कल मिलींद बुवा, तलाठी वैशाली पाटील यांचे पथक तयार करीत कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार पथकाने तापी महामंडळाच्या कार्यालयात धाव घेतली. थकीत रकमेचा भरणा न केल्यामुळे पथकाने कार्यकारी अभियंता वाघूर, जळगाव मध्यम प्रकल्प विभाग व सरदार सरोवर प्रकल्प या तीन अधिकार्यांची वाहने ताब्यात घेतली. जप्त केलेल्यामध्ये एमएच १९ जी ९९१२, एमएच १९ बीजे ७२३६, एमएच १९ बीजे ७१८७ या वाहनांचा समावेश आहे.