श्रीनगर : ‘लष्कर-ए-तैयबा’या दहशतवादी संघटनेच्या कारवायांचा पर्दाफाश करून जम्मू-काश्मीर पोलिसांनी दोन जणांना जेरबंद केले आहे. यापैकी एक जण मूळचा उत्तर प्रदेशचा आहे. दक्षिण काश्मीरमध्ये सहा पोलिसांची हत्या करणाऱ्या ‘लष्कर-ए-तैयबा’शी संबंधित गटाचा तो सक्रिय सदस्य होता. मुझफ्फरनगरचा संदीप कुमार शर्मा ऊर्फ आदिल व कुलगामचा मुनीब शाह या दोघांना अटक झाली आहे. आपल्या कारवाया तडीस नेण्यासाठी दहशतवादी संदीपचा वापर करून घेत.त्याचे गुन्हेगारी आणि दहशतवाद यात लागेबांधेही उघडकीस आले आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये जम्मू-काश्मीरमध्ये बँका लुटण्याचे प्रमाण वाढले होते. त्यामागेही शर्माच्या गटाचा हात होता. तपासात त्याने काश्मीरमध्ये बँका आणि एटीएम लुटण्याच्या घटनाही समोर आल्या. या लुटीतून दहशतवादी स्वत:सह संघटनेसाठी पैसा जमा करायचे. लष्कर-ए-तैयबाचा कमांडर बशीर लष्करी याचा १ जुलै रोजी जिथे खात्मा करण्यात आला, त्याच घरातून संदीपला जेरबंद करण्यात आले. त्याने दिलेल्या माहितीवरून मुनीब शाह तावडीत सापडला. >दहशतवादी कारवायांत सक्रिय सहभाग...१६ जून रोजी दक्षिण काश्मीरस्थित अच्छाबल भागात पोलीस पथकावर झालेल्या हल्ल्यात संदीप होता. या हल्ल्यात ठाणे अधिकारी फिरोज शहीद झाले होते, तर अन्य पाच जण ठार झाले होते. या सर्वांचे मृतदेह त्यांनी विद्रूप केले होते. ३ जून रोजी मुंडा येथे लष्कराच्या पथकावर झालेल्या हल्ल्यातही तो होता. या हल्ल्यात एक जवान शहीद झाला होता. अनंतनागचे सेवानिवृत्त न्या. मुजफ्फर अत्तार यांच्या सुरक्षेतील सुरक्षा कर्मचाऱ्यांकडील शस्त्रे हिसकावून घेण्याच्या घटनेतही तो होता. >गुन्हेगाराचे दहशतवाद्यांशी लागेबांधे...आता गुन्हेगार दहशतवाद्यांना साथ देत असल्याचा हा पैलू उजेडात आला आहे. लष्कर-ए-तैयबाने गुन्हेगारांची एक संघटना स्थापन केली आहे हेही दिसून आले आहे. खोऱ्यात कामासाठी आलेल्या परप्रांतीय कामगारांचीही आता चौकशी केली जाणार आहे.>२०१२मध्ये काश्मिरात...२०१२ मध्ये संदीप काश्मीर खोऱ्यात आला. त्याने वेल्डर म्हणून कामही केले. यंदा जानेवारीत खोऱ्यात परतल्यानंतर त्याने एटीएम आणि इतर ठिकाणी लूट करण्याचा बेत आखला. लूट आणि अन्य गुन्हेगारीच्या घटना तडीस नेण्यासाठी संदीप, मुनीब शाह, शाहीद अहमद आणि मुजफ्फर अहमद या चौघांंनी कुलगाममध्ये घर भाड्याने घेतले. तेथे हे चौघे लष्कर-ए-तैयबाचा शकूर अहमदच्या संपर्कात आले. येथून त्यांच्या गुन्हेगारी कारवायांना सुरुवात झाली. दहशतवाद्यांनी एटीएम लुटण्यासाठी संदीपची मदत घेतली.
तैयबाचा संदीप शर्मा अटकेत
By admin | Published: July 11, 2017 1:28 AM