नवी दिल्ली : तैवानवर संतापलेला चीन सध्या दक्षिण चीन समुद्राजवळ आपले वर्चस्व दाखवत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून चीनकडून तैवानला घेरून लाईव्ह फायर ड्रिल करत आहे. दरम्यान, चीनच्या या कुरापतीला उत्तर देण्यासाठी ऑस्ट्रेलियाच्या सागरी भागात मोठा सराव सुरू होणार आहे. आजपासून म्हणजेच 19 ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या या सरावात भारतासह 17 देश सहभागी होणार आहेत. या सरावात सहभाग देश स्पष्ट करत आहेत की, याचा चीनशी काहीही संबंध नाही आहेत. मात्र, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
ExPitchBlack22 नावाचा हा सराव 19 ऑगस्ट ते 6 सप्टेंबर या कालावधीत होणार आहे. जवळपास 100 लढाऊ विमाने आणि 2,500 लष्करी जवान, यात सहभागी होणार आहेत. कोरोनाच्या कालावधीनंतर लोकशाही देशांचे हे सर्वात मोठे शक्तीप्रदर्शन असणार आहे. भारतीय हवाई दल या सरावासाठी सुखोई 30 MKI आणि हवेत इंधन भरणारे विमान पाठवणार आहे.
या सरावात ऑस्ट्रेलिया, कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, इंडोनेशिया, भारत, जपान, मलेशिया, नेदरलँड, न्यूझीलंड, फिलिपाइन्स, दक्षिण कोरिया, सिंगापूर, थायलंड, संयुक्त अरब अमिराती, ब्रिटन आणि अमेरिका सहभागी होणार आहेत. हा सराव चीनच्या विरोधात नसल्याचे या देशांनी स्पष्ट केले आहे. पण, तैवानमध्ये लोकशाहीचे रक्षण करण्यासाठी आणि लोकशाहीच्या रक्षणाचा मोठा मुद्दा असल्याचेही स्पष्ट झाले आहे.
अमेरिकेच्या स्पीकर नॅन्सी पेलोसी आणि अमेरिकन खासदारांनी तैवानला दिलेल्या भेटीमुळे चीन संतापला आहे. संतापलेल्या चीनने गेल्या काही दिवसांत तैवानच्या भोवती लष्करी सराव सुद्धा केला होता. चीनने अनेक दिवसांपासून असे डावपेच चालवले होते की, दक्षिण चीन समुद्रात कर्फ्यूची परिस्थिती निर्माण झाली होती. हा व्यापाराचा सर्वात व्यस्त सागरी मार्ग असूनही चीनच्या दडपशाहीमुळे जहाजांची वाहतूक ठप्प झाली होती.
दरम्यान, चीनने तैवानच्या सागरी आणि हवाई सीमेचे उल्लंघन तर केलेच पण अगदी जवळून जिवंत शस्त्रांनी गोळीबार केला. यामुळे तैवानची सुरक्षा तर धोक्यात आली आहेच पण इतर देशांच्या जहाजांनाही धोका आहे. अशा परिस्थितीत आता चीननंतर उर्वरित देश सागरी क्षेत्रात आपली ताकद दाखवतील.