शादनगर : निवडणूक आयाेगाने रायथू बंधू याेजनेंतर्गत देण्यात येणाऱ्या अर्थसहाय्याचे वितरण थांबविल्याप्रकरणी तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (केसीआर) यांनी काँग्रेसला दाेषी ठरवले. सत्तेत आल्यानंतर थकीत हप्ता लगेच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येईल, असेही राव यांनी स्पष्ट केले.
शादनगर येथील प्रचारसभेत केसीआर यांनी काँग्रेसमधील रायथू बंधू याेजनेच्या लाभार्थ्यांनीच निवडणूक आयाेगात तक्रार करून वितरण राेखल्याचा आराेप केला. ते म्हणाले, ही एक नियमित याेजना आहे. रायथू बंधू वितरणाचे हे सहावे वर्ष आहे. हा काही नवा कार्यक्रम नाही. त्यांना असे वाटते की, रायथू बंधू राेखल्यास मते मिळतील. तुम्ही किती दिवस राेखू शकता? ३ डिसेंबरनंतर आमचे सरकार पुन्हा सत्तेत येणार आहे. ६ डिसेंबरनंतर आम्ही आनंदाने निधीवाटप करू, असेही ते म्हणाले. काॅंग्रेसचे पाऊल अतिशय ‘निकृष्ट’ असून त्या पक्षाचे अनेक नेते आणि कार्यकर्ते रायथू बंधू याेजनेचा लाभ घेतात, असेही केसीआर म्हणाले.