अलिगड - योग गुरू बाबा रामदेव यांनी पुन्हा एकदा वाढत्या लोकसंख्येवर भाष्य केले आहे. ''दोनपेक्षा अधिक मुलांना जन्माला घालणाऱ्यांचा मतदान अधिकार काढून घ्या. शिवाय, अशा लोकांना निवडणूक लढण्यासही परवानगी दिली जाऊ नये'', असे परखड मत बाबा रामदेव यांनी मांडले आहे. तसंच, दोनपेक्षा अधिक मुलं जन्माला घालणाऱ्या व्यक्तींना सरकारी नोकरीचीही संधी नाकारण्यात यावी, असंही बाबा रामदेव म्हणालेत.
स्वर्ण जयंती नगरमध्ये बुधवारी एका कार्यक्रमादरम्यान बाबा रामदेव यांनी विधान केले आहे. या कार्यक्रमादरम्यान लोकसंख्या नियंत्रणासंदर्भात ते म्हणाले की, ''जर एखाद्या व्यक्तीनं दोनपेक्षा अधिक मुलांना जन्म दिला तर त्यांना सरकारी सेवासुविधांचा लाभ मिळू नये आणि सोबत त्यांचा मतदानाचाही अधिकार काढून घ्यावा. तसंच अशा लोकांना सरकारी शाळांमध्ये प्रवेश देऊ नये, सरकारी रुग्णालयांमध्ये त्यांच्यावर औषधोपचार केले जाऊ नयेत. या सर्व गोष्टी रोखल्यानंतरच लोकसंख्येवर आपोआप नियंत्रण येईल''.
''काँग्रेसची अंतर्गत बाब'' यादरम्यान, बाबा रामदेव यांनी प्रियांका गांधी यांना सोपवण्यात आलेल्या काँग्रेसच्या सरचिटणीसपदाच्या जबाबदारीसंदर्भातही प्रतिक्रिया दिली. ही काँग्रेसची अंतर्गत बाब आहे. युद्धाच्या आखाड्यात पहेलवान ताकदवान असेल पाहिजेत, तेव्हाच जय आणि पराजयामध्ये मजा येते, असे बाबा रामदेव यांनी म्हटले.