नवी दिल्ली : मुंबई हल्ल्याचा मास्टरमार्इंड झकी- उर- रहमान लखवी याची जामिनावर मुक्तता करण्याच्या पाकिस्तानच्या निर्णयाचा शुक्रवारी संसदेत सर्वच पक्षांनी मतभेद बाजूला सारत तीव्र निषेध केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घडामोड धक्कादायक असल्याची प्रतिक्रिया दिली.२६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईत दहशतवादी हल्ला करणाऱ्या सर्व अतिरेक्यांना आणि कटात सहभागी असणाऱ्यांना कठोर शिक्षा ठोठावण्यासाठी सरकारने आवश्यक ती पावले उचलावी, अशी मागणी करीत सर्वच पक्षांनी एकजूट दाखविली. लोकसभेत संतप्त भावना व्यक्त होत असतानाच मोदींनी सभागृहात प्रवेश केला. त्यानंतर विदेशमंत्री सुषमा स्वराज यांनी विस्तृत निवेदन दिले. लगेचच सभागृहाने पाकिस्तानकडे जामीन मागे घेण्याची मागणी करणारा ठराव पारित केला.दहशतवादाबद्दल पाकचे दुटप्पी धोरण लखवीला जामीन मंजूर करण्याच्या कृतीतून पाकिस्तानचा दुटप्पी चेहराच दिसून येत असून सरकारने हा मुद्दा जोरदारपणे लावून धरावा, अशी मागणी विरोधकांनी केली. ही संपूर्ण देशासाठी चिंतेची बाब असून सरकारने आपली भूमिका स्पष्ट करायलाच हवी, मोदींनी पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांच्याशी चर्चा करून त्यांची भूमिका जाणून घ्यावी, असे काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी स्पष्ट केले.(लोकमत न्यूज नेटवर्क)
मास्टरमार्इंड लखवीचा जामीन मागे घ्या
By admin | Published: December 20, 2014 12:34 AM