श्रीनगर, दि. 2 - पुलवामा येथे सुरक्षा जवानांसोबत झालेल्या चकमकीत मारला गेलेला दहशतवादी अबू दुजाना याचा मृतदेह पाकिस्तानात पाठवण्याची तयारी सुरु करण्यात आली आहे. जम्मू काश्मीर पोलिसांनी यासंबंधी पाकिस्तानी उच्चायुक्ताशी संपर्क साधला असून अबू दुजानाचा मृतदेह घेऊन जाण्यास सांगितलं आहे. काश्मीरमध्ये लष्कर-ए-तैयबाचा प्रमुख असलेला अबू दुजाना पाकिस्तानचा नागरिक होता. जवळपास गेल्या सात वर्षांपासून अबू दुजाना काश्मीरमध्ये सक्रिय होता, सोबतच हिटलिस्टवरही होता.
मंगळवारी पुलवामा येथील काकापोरा येथे सुरक्षा जवानांसोबत झालेल्या चकमकीत अबू दुजाना ठार झाला. अबू दुजाना पाकिस्तानमधील गिलिगट-बाल्टिस्तान येथे राहणारा होता. मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या 27 वर्षात पहिल्यांदाच पाकिस्तान उच्चायुक्ताला पत्र लिहून एखाद्या दहशतवाद्याचा मृतदेह ताब्यात घेण्यास सांगण्यात आलं आहे. पाकिस्तानकडून मात्र अद्याप कोणतंही उत्तर किंवा प्रतिक्रिया आलेली नाही.
अबु दुजाना हा पाकिस्तानी नागरिक असून, तो २0१0 साली काश्मीरमध्ये आला आणि उत्तर काश्मीरमध्ये त्याने नेटवर्क उभारले. गेल्या वर्षी जुलैमध्ये लष्करी कारवाईत बुरहान वणी ठार झाल्यानंतर अबु दुजानाकडे संघटनेची सूत्रे होती. त्याच्या अटकेसाठी १५ लाख रुपयांचे बक्षीस लावण्यात आले होते. सुरक्षा दले गेले अनेक महिने त्याच्या शोधात होती. मध्यंतरी पळून जाताना तो स्वत:चा मोबाइल कारमध्ये विसरून गेला. तो सुरक्षा दलाच्या हातात लागल्यामुळे त्याची माहिती मिळवणे सुरू केले होते. सोमवारी मध्यरात्रीनंतर तो पत्नीला भेटण्यासाठी पुलवामा जिल्ह्याच्या हाकरीपोरा गावातील घरी आल्याची माहिती मिळताच सुरक्षा दलांनी त्या घराला घेरले. त्याला पहाटे साडेचार वाजता बाहेर येण्याचे आवाहन करण्यात आले. पण तो येत नव्हता. अखेर सकाळी साडेनऊ वाजता लष्कराने घरावर रॉकेट लाँचर डागले. त्याच वेळी अबू दुजानासह आरिफ ललहारीचा खात्मा झाला.
विशेष म्हणजे आतापर्यंत एकूण 114 दहशतादी ठार झाले असून अबु दुजाना आणि आरिफचा क्रमांक अनुक्रमे 115 आणि 116 होता. सुरक्षा यंत्रणांकडून मिळालेल्या अधिकृत आकडेवारीनुसार, यावर्षी 31 जुलैपर्यंत काश्मीर खो-यात एकूण 114 दहशतवादी ठार करण्यात आले आहेत. गतवर्षी 31 जुलैपर्यंत हा आकडा 92 होता. म्हणजेच यावर्षी 114 दहशतवादी ठार झाले असताना, 2016 मध्ये 92 दहशतवादी ठार झाले होते.