ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 5 - भारतीय लष्कराने पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून केलेल्या कारवाईवर शंका उपस्थित होऊ लागल्यानं आता सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप झडू लागले आहेत. मात्र या वादात केंद्रीय मंत्र्यांनी न पडता बोलताना काळजी घेण्याची गरज असल्याचं मत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्यक्त केलं आहे. उरी येथील लष्करी तळावर पाकपुरस्कृत दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय सैन्याने पाकव्याप्त काश्मीरमध्ये लक्षवेधी कारवाई करून दहशतवाद्यांचे ७ प्रशिक्षण तळ उद्ध्वस्त करून सुमारे ५० दहशतवाद्यांचा खात्मा केला होता. मात्र पाकिस्तानने अशी कारवाई झालीच नसल्याचा कांगावा सुरू केला होता. सुरुवातीला सरकार, लष्कर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन करणाऱ्या काँग्रेस आणि आम आदमी पक्षाच्या नेत्यांनी पाकिस्तानची री ओढत सर्जिकल स्ट्राइकच्या कारवाईवर शंका उपस्थित केली. या मुद्द्यावरून देशभरात वादाला तोंड फुटले असतानाच काँग्रेस नेते संजय निरुपम आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी कारवाईबद्दल शंका उपस्थित करून कारवाईचे पुरावे मागितले. यावर भारतीय जनता पक्षाने विरोधकांवर तोंडसुख घेतले. राजकीय पक्षाने लष्करावर शंका घेण्याचा हा पहिलाच प्रकार असल्याची टीका भाजपने केली. त्याच पार्श्वभूमीवर मोदींनी विरोधकांसह सहकारी मंत्र्यांना कानपिचक्या दिल्या आहेत. लष्कराने या कारवाईचा व्हिडीओ पंतप्रधान कार्यालयाकडे सुपूर्द केला असून, हा व्हिडीओ प्रसिद्ध करायचे किंवा नाही, याचा निर्णय पंतप्रधान मोदी घेणार आहेत. त्यांनी मंत्र्यांना या विषयात काहीही न बोलण्याची सूचना केली आहे.
सर्जिकल स्ट्राईकबाबत बोलताना काळजी घ्या, मोदींच्या मंत्र्यांना कानपिचक्या
By admin | Published: October 05, 2016 7:20 PM