ऑनलाइन लोकमत
गुवाहाटी, दि. 8 - आसाममधील भाजपाप्रणीत एनडीए सरकारने त्यांचा पहिला अर्थसंकल्प विधानसभेत सादर केला. आसामचे अर्थमंत्री हिमंत विश्व शर्मा यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात शेतकरी, तरुणवर्ण, महिला याव्यतिरिक्त पायाभूत सुविधा आणि ग्रामीण विकासावरही लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे.
यावेळी शर्मा यांनी सरकारी कर्मचा-यांच्या वृद्ध आईवडिलांचा सांभाळ करण्यासंदर्भात एक अनोखा प्रस्तावही सादर केला. जे सरकारी कर्मचारी त्यांच्या वृद्ध आई-वडिलांची काळजी घेणार नाही, त्यांचा सांभाळ करणार नाहीत, अशा कर्मचा-यांच्या पगारातून एका हिस्सा कापला जाईल, आणि तोच हिस्सा त्यांच्या आईवडिलांना देण्यात येईल, असा नवीन नियम यावेळी त्यांनी जाहीर केला.
शर्मा यांनी सांगितले की, 'वयोवृद्ध आईवडिलांचा सांभाळ करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. सरकारी सेवेत असणारा कर्मचारी आईवडिलांची काळजी घेऊ शकत नसेल तर सरकारकडून कर्मचा-यांच्या पगारातून काही हिस्सा कापून त्यांच्या आईवडिलांना दिला जाईल'.
दरम्यान, शर्मा यांनी 2017-18 वर्षासाठी राज्याचा 2,349.79 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात शैक्षणिक संस्थांसाठी जवळपास 1,000 कोटी रुपये, चहाच्या बागेत काम करणा-या मजुरांसाठी 287 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. शिवाय, तीन अभियांत्रिकी महाविद्यालय आणि दोन वैद्यकीय महाविद्यालयांसहीत 34 नवीन महाविद्यालयांची घोषणा केली.