नवी दिल्ली: ५४ दिवसांपासून आगीने धुसमुसत असलेल्या मणिपूरमध्ये काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भेट देण्यावरून गुरुवारी नाट्यमय घडामोडी घडल्या. सुरक्षेच्या कारणावरून स्थानिक प्रशासनाने रोखल्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता. स्थानिकांना राहुल गांधींशी चर्चा करायची होती. मात्र, पोलिसांनी त्यांना पांगवण्यासाठी अश्रूधुराचा मारा करावा लागला. अखेर राहुल यांनी चुराचांदपूर येथील मदत शिबिराला भेट देत स्थानिकांशी संवाद साधला.
राहुल गांधी यांच्यासोबत संवाद साधताना काही स्थानिकांना रडू कोसळले. त्यांनी आपल्या अडचणी सांगितल्या. राहुल गांधी यांनी हिंमत ठेवा, सर्व ठीक होईल, मी तुमच्यासोबत आहे, असं सांगत धीर देण्याचा प्रयत्न केला. मी माझ्या मणिपूरच्या सर्व बंधू-भगिनींचे ऐकण्यासाठी आलो आहे. सर्व समाजातील लोक खूप प्रेमळ स्वागत करत आहेत. मणिपूरला उपचारांची गरज आहे. शांतता ही आपली एकमेव प्राथमिकता असली पाहिजे, असे राहुल गांधी यांनी सांगितले.
मणिपूरमध्ये ३ मे रोजी हिंसाचार सुरू झाल्यापासून विरोधक राज्यातील परिस्थितीवर सातत्याने प्रश्न उपस्थित करत आहेत. विरोधी पक्ष केंद्र सरकार आणि भाजपवर निशाणा साधत आहेत. या पक्षांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या परदेश दौऱ्यापूर्वी भेटीची वेळ मागितली होती. यानंतर सर्व पक्षांनी मिळून मणिपूरवर निवेदन दिले. या सर्व परिस्थितीमध्ये गृहमंत्री अमित शहा यांनी विरोधी पक्षांची बैठक बोलावली होती. बैठकीत गृहमंत्र्यांनी विरोधी पक्षांचे म्हणणे ऐकून घेतले आणि मणिपूरमधील परिस्थिती लवकरच पूर्वपदावर येईल असे आश्वासन दिले.