नवी दिल्ली, दि. 24 - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी मन की बात कार्यक्रमाच्या माध्यमातून देशवासियांशी संवाद साधला. यावेळी अन्नाची नासाडी न करण्याचे, खादीच्या वापरास प्रोत्साहन देण्याचे आणि स्वच्छता राखण्याचे आवाहन मोदींनी देशवासियांना केले. तसेच यंदाच्या पर्यटन हंगामात देशातील पर्यटन वाढवण्यासाठी देशवासियांनी पुढाकार घ्यावा देशाच्या विविध भागात भ्रमण करून देश समजून घ्यावा, आपल्या अनुभवांचे आदानप्रदान करावे, तसेच विविध पर्यटन स्थळे आणि तेथील लोकजीवनाची छायाचित्रे इन्क्रेडेबल इंडियासोबत शेअर करून पर्यटनवाढीस प्रोत्साहन द्यावे असे आवाहन केले.
मन की बातच्या माध्यमातून देशवासियांशी संवाद साधण्याची मोदींची ही 36 वेळ होती. आज देशवासियांना संबोधित करताना मोदींनी पर्यटन, स्वच्छता आणि खादीच्या प्रसारावर भर दिला. देशातील पर्यटनवाढीसाठी आवाहन करताना मोदी म्हणाले," पर्यटनासाठी परदेशात जाणे चांगले आहे. पण आपल्या देशातही पाहण्यासारखे बरेच काही आहे. त्यामुळे तुम्ही सर्वात आधी आपल्या देशाला समजून घ्या. देशातील महापुरुषांनी सर्वात आधी देशभरात भ्रमण करून देश समजून घेतला. मीसुद्धा देशाच्या बहुतांश भागात भ्रमण केले आहे. त्याचा आज मला फायदा होत आहे. जेव्हा तुम्ही विद्यार्थी म्हणून भ्रमंती कराल तेव्हा पर्यटनामध्ये गुणात्मक वाढ होईल."लष्करात सेवेत असलेल्या पतील वीरमरण आल्यानंतर परिस्थितीला धैर्याने सामोरे जात लष्करात दाखल झालेल्या लेफ्टनंट स्वाती महाडिक तसेच निधी दुबे यांचेही मोदींनी विशेष कौतुक केले. या वीरांगनांचे धैर्य असामान्य असल्याचे मोदींनी सांगितले. देशवासियांशी संवाद साधताना, अन्नाचा अपव्यय टाळण्याचे आवाहन मोदींनी केली. गरज असेल तेवढेच अन्न घ्या, वाया घालवू नका असे मोदी म्हणाले. तसेच खादीच्या अधिकाधिक वापरासाठी देशवासियांनी पुढाकार घ्यावा, गेल्या काही काळात खादीच्या भेटवस्तू देण्याचे प्रमाण वाढले आहे. मात्र खादीचे अभियान अधिक व्यापक करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. स्वच्छता अभियानात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या श्रीनगरमधील बिलाल डारचे मन की बातमध्ये कौतुक केले. बिलाल श्रीनगरमधील दाल सरोवराच्या स्वच्छतेसाठी प्रयत्न करत आहे. तसेच त्याच्या कामाची दखल घेत श्रीनगरमधील पालिकेने त्याची स्वच्छतेच्या ब्रँड अॅम्बॅसिडरपदी नियुक्ती केली आहे. देशात स्वच्छता अभियानाचा प्रसार करण्यासाठी प्रसारमाध्यमांनी मोलाची भूमिका बजावल्याचे सांगत मोदींनी प्रसारमाध्यमांचे आभार मानले. तसेच सरदार पटेल यांच्या जयंती दिनी 31 ऑक्टोबर रोजी देशभरात रन फॉर युनिटीचे आयोजन करण्याचे आवाहनही मोदींनी केले.