नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीच्या अंतिम टप्प्यातील प्रचाराला वेग आलेला आहे. देशाची राजधानी असलेली दिल्ली काबीज करण्यासाठी सगळेच पक्ष प्रयत्नशील आहे. आपचे नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सोमवारी प्रचारादरम्यान मतदारांना आवाहन केलं आहे की, अन्य राजकीय पक्षांकडून तुम्हाला पैसे दिले जातील. तुम्ही पैसे घ्या पण तुमचं मत आप पक्षाला द्यावं असं केजरीवालांनी सांगितले.
दक्षिण दिल्लीतील आप पक्षाचे उमेदवार राघव चड्डा यांच्या प्रचारासाठी अरविंद केजरीवाल यांनी रोड शो घेतला. त्यामध्ये अरविंद केजरीवाल यांनी काँग्रेस आणि भाजपावर नाव न घेता टीका केली. मतदानाच्या एक दिवस आधी मतदारांना राजकीय पक्षांकडून प्रलोभने दिली जातात. आपल्यालाही कोणी अशी प्रलोभने देत असतील तर ती घ्यावी, कोणीही नकार देऊ नका मात्र तुमचं मत झाडूलाच द्यावं असं ते म्हणाले. झाडू हे आम आदमी पक्षाचे निवडणुकीचं चिन्ह आहे.
निवडणुकीच्या सहाव्या आणि सातव्या टप्प्यासाठी राजकीय नेत्यांचा प्रचार सुरू आहे. दोन दिवसांपूर्वी अरविंद केजरीवाल यांनी प्रचारादरम्यान मोदींवर गंभीर आरोप केले होते. नोटाबंदी हा देशातील स्वातंत्र्यानंतरचा सर्वात मोठा घोटाळा आहे. जर व्यापाऱ्यांनी भाजपाला मतदान केलं तर सीलिंग सुरूच राहणार आहे. पण 'आप'ला मतदान केल्यास सीलिंग थांबू शकतं, असंही केजरीवाल म्हणाले होते. मोदींनी राफेलमधून बक्कळ पैसा कमावला, त्याच पैशानं आता मोदी आमदार विकत घेत आहेत असा टोला केजरीवाल यांनी लगावला होता.
काही दिवसांपूर्वीच भाजपकडून दावा करण्यात आला होता की, 'आप'चे सात आमदार आमच्या संपर्कात आहेत. तर भाजपकडून आमचे आमदार खरेदी करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप 'आप'कडून करण्यात आला होता. तर मागील एका आठवड्यात आपचे तीन आमदारांनी भाजपाची वाट धरली आहे.
दिल्ली येथे लोकसभेच्या एकूण 7 जागा आहेत. या जागेवर मागील निवडणुकीत भाजपाने एकहाती कब्जा केला होता. त्यामुळे या जागांवर विजय मिळविण्यासाठी आप आणि काँग्रेस प्रयत्नशील आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस आणि आपमध्ये आघाडीबाबत अनेकवेळा चर्चा झाल्या मात्र आघाडी फिस्कटल्याने अखेर काँग्रेस आणि आम आदमी पक्ष स्वतंत्र्यपणे दिल्ली लोकसभा निवडणूक लढवत आहे.