चंडीगड : भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून पंजाबमध्ये एका मंत्र्याची तडकाफडकी हकालपट्टी करून तुरुंगात टाकण्यात आले. त्याच पंजाबमध्ये एका वीज मीटर रीडरच्या लाचखाेरीचे प्रकरण समाेर आले आहे. या रीडरला १ हजार रुपयांची लाच घेताना पकडल्यानंतर त्याने त्या नाेटा ताेंडात टाकून गिळण्याचा प्रयत्न केला. मात्र, लाेकांनी त्याच्या ताेंडात हात टाकून त्या नाेटा बाहेर काढल्या. नागरिकांनी त्याला पकडण्यासाठी सापळा रचला हाेता. या घटनेचा व्हिडिओ रेकाॅर्ड केला आहे.
पंजाबच्या माेगा जिल्ह्यातील अजितवाल तालुक्यात ही घटना घडली. मीटर रीडरने एका कुटुंबाकडून १ हजार रुपयांची लाच घेतली. हा प्रकार लक्षात येताच गावकऱ्यांनी त्याला पकडले. काहीजणांनी त्याचा व्हिडिओ बनवायला सुरुवात केली. हे कळताच त्याने लाच स्वरूपात मिळालेल्या ५०० रुपयांच्या दाेन नाेटा गिळण्याचा प्रयत्न केला. मात्र, लाेकांनी त्याच्या ताेंडातून त्या नाेटा काढल्या. लाचखाेरीच्या प्रकरणाची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आता चाैकशी सुरू केली आहे. (वृत्तसंस्था)
असा रचला सापळामीटर रीडरच्या लाचखाेरीची कुणकुण गावकऱ्यांना लागली हाेती. त्यामुळे ५०० रुपयांच्या नाेटांची आधी झेराॅक्स काॅपी काढून ठेवली हाेती. त्याच्या ताेंडातून काढलेल्या नाेटा आणि झेराॅक्स काॅपीवरील नाेटांच्या नंबरची पडताळणीही करण्यात आली.