लखनऊ - सापाने दंश केला म्हणून संतापाच्या भरात बदला घेण्यासाठी शेतक-याने सापाच्या फण्याचा चावा घेतल्याची आश्चर्यकारक आणि तितकीच धक्कादायक घटना घडली आहे. उत्तर प्रदेशातील हरदोई गावात ही घटना घडली आहे. विशेष म्हणजे शेतक-याने घेतलेल्या चाव्यानंतर सापाचा मृत्यू झाला असून, शेतकरी मात्र ठणठणीत आहे. शेतक-यावर उपचार करणारे डॉक्टर संजय कुमार यांनीही आपण आतापर्यंत अशी एकही केस पाहिली नव्हती असं सांगत आश्चर्य व्यक्त केलं आहे. सोनेपाल असं या शेतक-याचं नाव आहे.
सापाने दंश केल्यानंतर सोनेपाल यांनी संतापाच्या भरात सापाच्या फण्याचा चावा घेतला. सापाचा चावा घेतल्यानंतर सोनेपाल बेशुद्ध पडले होते. मात्र त्यांच्यावर उपचार करणा-या डॉक्टरांना त्यांच्या शरिरावर कुठेही सर्पदंश झालेला दिसला नाही.
शनिवारी 17 फेब्रुवारीला रुग्णावहिकेच्या 108 क्रमांकावर एक शेतकरी बेशुद्ध पडला असल्याचा फोन आला होता. त्यानंतर तात्काळ त्यांना रुग्णालयात हलवण्यात आलं. सोनेपाल शुद्धीवर आल्यानंतर नेमकं कशामुळे ते बेशुद्द पडले याबाबत विचारणा करण्यात आली. यावेळी त्यांनी सांगितलं की, 'सापाने मला दंश केला होता. म्हणून मग मी त्याचा फणा चावला. यामुळे सापाचा मृत्यू झाला', अशी माहिती सोनेपाल यांनी दिली आहे. 'त्यानंतर मी त्या सापाला गावात आणलं आणि फणा कापून टाकला', असंही त्यांनी सांगितलं आहे.
साक्षीदारांनी आपण सोनेपाल यांना सापाचा चावा घेताना पाहिलं असल्याचं सांगितलं आहे. डॉक्टरांनी मात्र आपल्याला सोनेपाल यांच्या शरिरावर एकही जखम दिसत नसल्याचं सांगितलं आहे. मात्र सापाचा चावा घेतल्यानंतरही सोनेपाल जिवंत आहेत यामुळे डॉक्टर आणि गावकरी आश्चर्यचकित झाले आहेत. 'त्यांना सापाचा फणा जवळपास खाल्ला होता. मी माझ्या संपुर्ण आयुष्यात अशी केस पाहिलेली नाही', असं डॉक्टर कुमार यांनी सांगितलं आहे.