कोलकाता - भाजपा आणि तृणमूल काँग्रेसमधील तणाव निवडणूक निकालानंतरही शमला नसल्याचं चित्र आहे. शनिवारी तृणमूल आणि भाजपाच्या कार्यकर्त्यामध्ये झालेल्या राड्यात भाजपाच्या 3 आणि तृणमूलच्या एका कार्यकर्त्याचा मृत्यू झाला. केंद्र सरकारच्या गृह मंत्रालयाने या घटनेचा सविस्तर अहवाल मागविला असून राज्य सरकारला कायदा आणि सुव्यवस्था राखण्याच्या सूचना दिल्या आहेत.
तसेच जे कोणी अधिकारी बेजबाबदारपणे वागत असतील त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल असा इशारा गृह मंत्रालयाने दिला आहे. भाजपाचे प्रदेश महासचिव सयांतन बसु यांनी भाजपाच्या तीन कार्यकर्त्यांचा हिंसक घटनेत मृत्यू झाल्याचं सांगितलं. तपन मंडल, सुकांत मंडल आणि प्रदीप मंडल असं या कार्यकर्त्यांची नावे आहेत. भाजपा नेते मुकुल रॉय यांनीही ट्विट करत घडलेल्या हिंसक प्रकाराला पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी जबाबदार असल्याचा आरोप केला आहे.
तसेच मुकुल रॉय यांनी सांगितले की, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पश्चिम बंगालमधील घटनेबाबत आढावा दिला आहे. तर दुसरीकडे पश्चिम बंगाल सरकारमधील मंत्री ज्योतिप्रियो मलिक यांनी भाजपाच्या कार्यकर्त्यांनी टीएमसीच्या कार्यकर्त्याची हत्या केली आहे. राज्यात कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचं काम राज्य सरकार करेल यामध्ये केंद्र सरकारचं देणंघेणं नाही.
लोकसभा निवडणुकीदरम्यानही पश्चिम बंगालमध्ये राजकीय हिंसेचे अनेक प्रकार समोर आले होते. तसेच काही कार्यकत्यांची हत्या झाली होती. कार्यकर्त्यांच्या हत्येनंतर त्यांच्या अंत्यसंस्कारावरून शनिवारी भाजपाचे स्थानिक नेते आणि पोलिसांमध्ये वाद झाला. तसेच रविवारी अंत्यसंस्कारासाठी बशीरहाट येथील पक्ष कार्यालयात नेण्यात येणारे भाजपा कार्यकर्त्यांचे मृतदेह मध्येच अडवण्यात आले. त्यामुळे संतप्त कार्यकर्त्यांनी रस्त्यातच या दोन मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याची तयारी केली होती.
पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस आणि भाजपाच्या कार्यर्त्यामधील वैर दिवसेंदिवस वाढत आहे. दरम्यान, बशीरहाट लोकसभा मतदारसंघात झालेल्या हिंसाचारात चार भाजपा कार्यकर्त्यांच्या झालेल्या हत्येसाठी तृणमूल काँग्रेस जबाबदार असल्याचा आरोप भाजपाचे नेते मुकुल रॉय यांनी केला होता. पश्चिम बंगालमध्ये सत्तेवर असलेल्या ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस पक्षाला यावेळच्या लोकसभा निवडणुकीत भाजपाने कडवे आव्हान दिले होते. दरम्यान, लोकसभेची निवडणूक तणावपूर्ण वातावरणात पार पडल्यानंतर राज्यात झालेली हिंसाचाराची ही पहिलीच मोठी घटवा आहे. संदेशखली बशिरहाट लोकसभा मतदारसंघामधील भाग असून, बशीरहाटमधून नुसरत जहाँ या खासदार म्हणून निवडून आल्या आहेत.
दरम्यान पोलिसांवर मनमानी केल्याचा आरोप करत भाजपाने सोमवारी (10 जून) रोजी बशीरहाटसह संपूर्ण बंगालमध्ये 12 तासांचा बंद पुकारण्यात आलेला आहे. भाजपा हा दिवस काळा दिवस म्हणून पाळून राज्य सरकारचा निषेध करणार आहे.