अहमदाबाद : सामान्य चहाविक्रेता ते देशाचा पंतप्रधान अशी झेप घेणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल सर्वसामान्य जनतेत उत्सुकता आहे. मोदी यांचे गाव, मोदी जिथे चहा विकत असत ते रेल्वेस्थानक पाहण्याची उत्सुकता लोकांना असणारच! हे लक्षात घेऊन गुजरातच्या पर्यटन खात्याने नवी टूर जाहीर केली आहे.या योजनेंतर्गत मोदी यांचे जन्मगाव वडानगर, त्यांची शाळा व ते जिथे चहा विकत असत ते रेल्वेस्थानक ही स्थळे दाखविली जात असून, त्यासाठी सहाशे रुपयांचे तिकीट आकारण्यात येत आहे. या टूरला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे सांगण्यात येत आहे. या टूरचे नाव ए राईज फ्रॉम मोदीज व्हिलेज असे असून, अक्षर ट्रॅव्हल्स व गुजरात पर्यटन महामंडळ यांचे हे पॅकेज आहे. महामंडळाच्या वेबसाईटवर त्याचा प्रचार करण्यात येत आहे. मोदी यांच्या जीवनाची झलक दाखविणारी अशी ही टूर फक्त ६०० रुपयात उपलब्ध आहे. संपूर्ण देशातून या टूरसाठी लोक येत आहेत, असे संयोजकानी सांगितले. वडानगर रेल्वेस्थानक ही या टूरमधील सर्वात अविस्मरणीय अशी जागा आहे. मोदी यांच्या पूर्वायुष्याची माहिती असणाऱ्यासाठी हे स्थळ नक्कीच खास आहे. (वृत्तसंस्था)
६०० रुपयांत करा पंतप्रधानांच्या गावाची सहल
By admin | Published: April 07, 2015 11:08 PM