नवी दिल्ली: दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपाच्या प्रचाराची धुरा सांभाळणाऱ्या केंद्रीय मंत्री अमित शहांनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांना लक्ष्य केलं आहे. केजरीवालांनी शर्ट काढावं आणि यमुनेत डुबकी मारुन पाहावं, असं आव्हान शहांनी दिलं आहे. यमुना नदीची अवस्था अतिशय वाईट असल्याचं म्हणत शहांनी केजरीवालांवर जोरदार टीका केली. 'आम्ही यमुना नदीचं पाणी स्वच्छ करू, असं ते (आम आदमी पार्टी) म्हणतात. केजरीवालजी, आज मी तुम्हाला आव्हान देतो. तुम्ही तुमचं शर्ट काढा आणि यमुनेत डुबकी मारा. मग तुम्हाला यमुनेतील पाण्याच्या परिस्थितीचा अंदाज येईल,' अशा शब्दांत शहांनी केजरीवालांवर तोंडसुख घेतलं. नजाफगडमध्ये ते जनसभेला संबोधित करत होते. यमुना स्वच्छतेसह पायाभूत सोयी सुविधांच्या उभारणीसाठी मोदी सरकारनं दिल्ली सरकारला निधी द्यावा, अशी मागणी अर्थसंकल्प सादर होण्याच्या पार्श्वभूमीवर केजरीवालांनी केली होती. त्यावरुन शहांनी केजरीवालांवर टीका केली.'दिल्लीत आंतरराष्ट्रीय दर्जाच्या वाहतूक सुविधा पुरवण्यासाठी केंद्र सरकारनं पायाभूत सुविधांच्या विकासासाठी निधी द्यायला हवा. यमुनेच्या स्वच्छतेसाठी, मेट्रो मार्गिकांच्या विस्तारीकरणासाठी दिल्ली सरकारला पुरेसा निधी मिळायला हवा,' असं केजरीवालांनी म्हटलं होतं. यावरुन शहांनी केजरीवालांना लक्ष्य केलं. शहांनी त्यांच्या भाषणात दिल्लीतल्या प्रदूषणाचादेखील उल्लेख केला. दिल्लीतल्या प्रदूषणाला केजरीवालच जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी केला. केजरीवाल दिल्लीत युरोपसारखे रस्ते तयार करणार होते. मात्र त्यांना रस्त्यांमधले खड्डेदेखील बुजवता येत नाहीत, अशी टीका शहांनी केली.
तुमचं शर्ट काढा आणि...; अमित शहांचं मुख्यमंत्री केजरीवालांना आव्हान
By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2020 9:24 PM