नवी दिल्लीकोरोना पॉझिटीव्ह रुग्णाच्या घराबाहेर पोस्टर लावू नका, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारांना दिला आहे.
केंद्राने आपल्या नियमावलीत अशाप्रकारे कोरोना रुग्णाच्या घरावर पोस्टर लावण्याबाबत कुठेही उल्लेख केला नाही. मात्र, आपत्ती निवारण अधिनियमाअंतर्गत अधिकाऱ्यांमार्फत विशिष्ट प्रकरणातच कोरोना रुग्णाच्या घरासमोर सूचना फलक लावला जाऊ शकतो, असं सर्वोच्च न्यायालयाने आपल्या आदेशात नमूद केलं आहे.
कोरोना रुग्णाच्या घराबाहेर अशाप्रकारे पोस्टर लावण्याचा प्रकार बंद करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. त्यावर न्यायाधीश अशोक भूषण यांच्या खंडपीठाने यावर आज निकाल दिला.
नेमकं प्रकरण काय? घरातील एखाद्या व्यक्तीचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्याच्या घराबाहेर पोस्टर लावण्यात येत आहे. त्यामुळे संबंधित घरातील नागरिकांना अस्पृश्याप्रमाणे वागणूक मिळत असल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. या घटना अतिशय भीषण असल्याचं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे. दरम्यान, असं करण्यामागे कोरोना रुग्णाला इजा किंवा त्याची मानहानी करण्याचा कोणताही हेतू नव्हता असं सरकारने स्पष्ट केलं आहे. तसेच अशाप्रकारे पोस्टर लावण्यामागे अन्य लोकांची सुरक्षा हाच उद्देश असल्याचंही केंद्रानं म्हटलं आहे.