रशिया-युक्रेन युद्धानंतर जगातील परिस्थिती पार बदलली आहे. अख्खा युरोप रशियाकडून कच्चे तेल आजही खरेदी करत आहे, परंतू भारताने स्वस्तात आपल्या इंधनाची गरज भागविली तर त्यांना ते चालत नाहीय. यामुळे भारतावर युरोपीय युनियनने अनेकदा प्रश्न उपस्थित केले आहेत. त्याला परराष्ट्र मंत्री जयशंकरनी दरवेळी चोख प्रत्यूत्तर दिले आहे.
यावेळीही युरोपीय युनियनच्या परराष्ट्र निती प्रमुखांनी भारताकडे बोट दाखवायची हिंमत केली. रशियाकडून कच्चे तेल खरेदी करून ते आम्हाला विकताय, हे चुकीचे आहे असे ते म्हणाले. जोसेफ बोरेल यांनी भारताच्या रिफाईन्ड प्रॉडक्टवर बंदी घालण्याची मागणी केली. ही उत्पादने रशियन तेलाचा वापर करून तयार केलेली आहेत, असा त्यांचा दावा आहे.
यावर जयशंकर यांनी तुम्ही आधी युरोपीय संघ परिषदेच्या नियम पहावेत. रशियन कच्च्या तेलाला तिसऱ्या देशाने खूप काही करून बदलले असेल तर ते रशियन मानले जात नाही. यासाठी तुम्ही आधी नियम नंबर 833/2014 पहावा आणि मग बोलावे, असा खोचक सल्ला दिला.
भारत रशियन तेलाचे रिफाइंड इंधन म्हणजेच पेट्रोल-डिझेलमध्ये रूपांतर करून युरोपमध्ये विकत आहे. त्यामुळे युरोपियन युनियनने भारतावर कारवाई करावी, असे बोरेल म्हणाले होते. पाश्चात्य देश रशियाच्या ऊर्जा क्षेत्रावरील कारवाई तीव्र करत आहेत आणि त्यावर दबाव आणत आहेत. दुसरीकडे भारत रशियन तेल खरेदीसाठी काम करत आहे. भारत रशियाकडून तेल खरेदी करतो, त्यामुळे त्यांची कोणतीही तक्रार नाही. परंतू, त्यावर प्रक्रिया करून आम्हाला विकले जात आहे त्यावर आक्षेप आहे, असे ते म्हणाले.