- मयूर पठाडे
खूप श्रम झालेत, अंग दुखतंय, थोडी कसकस वाटतेय, डोकं जड झालंय, ताप आल्यासारखा वाटतोय, आराम करावासा वाटतोय, काही करण्याचा उत्साह नाही, मोठा प्रवासानं अंग आळसावलंय. आपण काय करतो? सरळ मेडिकल स्टोअर्समध्ये जातो, पेनकिलर्स घेऊन येतो आणि डॉक्टरांच्या सल्ल्याविना, कोणत्याही तज्ञाला काहीही न विचारता सरळ घेऊन टाकतो. अनेकांच्या घरात तर पेनकिलर्सची स्ट्रिप आणूनच ठेवलेली असते. काही झालं, अगदी सर्दी पडसं झालं तरी पेनकिलर्सच्या गोळ्यांचा डोस घेणारे आपल्याकडे कमी नाहीत.
आपल्याकडेच नाही, ‘बिनखर्चाचा’ आणि ‘स्वस्तातला’ हा फॉर्म्युला जगभरात सगळीकडेच वापरला जातो.
पण सर्वसामान्यांच्या याच सवयींचा विस्तृत अभ्यास केल्यानंतर संशोधकांच्या एका टीमनं सावधानतेचा इशारा दिला आहे. नुकताच हा अभ्यास प्रसिद्ध झाला आहे.
संशोधकांच्या या आंतरराष्ट्रीय टीमनं कॅनडा, फिनलंड आणि इंग्लंड अशा तीन देशांतील जवळपास तब्बल साडेचार लाख लोकांचा अभ्यास केला, सातत्यानं त्यांची निरिक्षणं केली आणि निष्कर्ष काढला, जर तुम्ही सातत्यानं पेनकिलर्स घेत असाल, तर तुमच्यात हार्ट अँटॅकचा धोका प्रचंड मोठय़ा प्रमाणात वाढू शकतो.
युनिव्हर्सिटी ऑफ मॉन्ट्रियल हॉस्पिटलचे रोगपरिस्थितीविज्ञान तज्ञ आणि या क्षेत्रातील अंतररराष्ट्रीय तज्ञ व अभ्यासक डॉ. मिशेल बॅली आणि त्यांच्या तज्ञ टीमनं हा अभ्यास केला आहे.
त्यासंदर्भात त्यांनी अनेक निरिक्षणंही नोंदवली आहेत.
नेमकं काय होतं?
1- अनेक जण पेनकिलर्सचे उच्च डोस सातत्यानं घेतात. वैद्यकीय परिभाषेत त्यालाच ‘नॉनस्टिरॉयडल अँण्टी इन्फ्लमेटरी ड्रग्ज’ (एनएसएआयडी) असंही म्हटलं जातं. आरोग्यावर याचा खूपच विपरित परिणाम होतो.
2- एकतर पेनकिलर्स मेडिकल स्टोअर्समध्ये सहजासहजी कोणालाही मिळू शकतात. बर्याचदा त्यासाठीचं डॉक्टरांनी दिलेलं प्रिस्क्रिप्शनही फार्मास्टि पाहात नाही. बर्याचदा अनेकांचा सल्ला असतोच, ‘अरे किरकोळ अंगदुखी आहे ना, मग घेऊन एखादी पेनकिलर.’ तोच सल्ला आपण शिरोधार्य मानतो आणि पेनकिलर्सचं सेवन वाढत जातं.
2- संशोधकांच्या म्हणण्यानुसार पेनकिलर घेतल्यावर पहिल्या आठवड्यापासूनच हृदयविकाराचा धोका वाढू शकतो.
3- तुम्ही जर वारंवार पेनकिलर्स घेत असाल तर हृदयविकाराचा धोका आणखीच वाढतो आणि पेनकिलर घेतल्यानंतर तब्बल एक महिन्यापर्यंत तुम्हाला हार्टअँटॅकचा धोका असू शकतो असं निरीक्षणही संशोधकांनी वर्तवलं आहे.
4- पेनकिलर्सच्या औषधांवर दिलेल्या सूचनाही अनेक जण वाचत नाहीत आणि सरळ ही औषधं सेवन करतात. बर्याचदा लहान मुलांनाही ही औषधं अगदी सहजपणे घराघरांत दिली जातात. त्यामुळे लहानांपासून मोठय़ांपर्यंत सर्वांच्याच आरोग्याला धोका पोहोचतो आहे.
आंतरराष्ट्रीय संशोधकांच्या या टीमनं हा अभ्यास प्रसिद्ध केल असला तरी आम्ही अजूनही यावर संशोधन करीत आहोत आणि पुढील निष्कर्ष लवकरच प्रसिद्ध करू असंही त्यांनी म्हटलं आहे.