ऑनलाइन लोकमत
चंदिगड, दि. 15 - अर्ध्या डझनहून जास्त लोकांनी एका 26 वर्षीय तरुणाला बेदम मारहाण करत, तलवारीने वार करुन नंतर रस्त्यावरुन गाडीच्या सहाय्याने फरफटत नेऊन हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हा हल्ला एका स्थानिक राजकारण्याच्या मुलाच्या सांगण्यावरुन करण्यात आला होता. हल्लेखोरांनी हत्या केल्यानंतर काही अंतरावर हा मृतदेह टाकून दिला होता. एखाद्या जनावराने करावा अशा प्रकारे करण्यात आलेल्या या हल्ल्यात तरुणाचा चेहरा ओळखूही येत नव्हता. वरिंदर सिंग साधू असं या पीडित तरुणाचं नाव आहे.
हरियाणा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मनमीत सिंग वारीच हा या हल्ल्याचा मुख्य सुत्रधार आहे. मनमीत सिंग एक कंत्राटदार असून इंडियन नॅशनल लोक दलाचे नगरसेवक गुरप्रीत कौर यांचा मुलगा आहे.
आम्ही गुन्हा नोंद केला असून लवकरच सर्वांना अटक करण्यात येईल अशी माहिती पंचकुला पोलीस प्रमुख अली धवन यांनी दिली होती. न्यायाची मागणी करत पीडित तरुणाच्या नातेवाईक आणि कुटुंबाने चंदिगड - पंचकुला रस्त्यावर आंदोलन सुरु करत रस्ता अडवला होता. यानंतर पोलिसांनी मनप्रीत आणि त्याचा एक साथीदार दिलप्रीतला अटक केल्याचं सांगितलं.
हत्येचं नेमकं कारण पोलिसांना अद्याप कळू शकलेलं नाही. कुटुंबाचं म्हणणं आहे की, गतवर्षी क्रिकेट सामन्यादरम्यान दोघांमध्ये शाब्दिक चकमक उडाली होती. पण दोघांनीही चर्चा करुन हे प्रकरण मिटवलं होतं. वडिलांच्या निधनानंतर वरिंदर आपल्या आईसोबत सकेत्री गावात राहू लागला होता. एका खासगी कंपनीत तो काम करत होता.
वरिंदर त्यादिवशी जेवण करत असताना मनमीत आपल्या साथीदारांसोबत घरात घुसला आणि त्याने मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यांनी त्याला खेचत नेलं आणि तलवारीने वार केले. यानंतर त्यांच्यातील दोघांनी पार्किग डोअर उघडून वरिंदरचे पाय पकडले आणि गाडी सुरु करुन त्याला रस्त्यावरुन फरफटत नेलं. वरिंदरचा चेहराही ओळखू येत नव्हता इतकी पाशवी मारहाण त्याला करण्यात आली होती. एका राजकारण्याचा मुलगा असल्याने पोलीस तपासात टाळाटाळ आणि दिरंगाई करत असल्याचा आरोप कुटुंबाने केला आहे.