अवैध बोअरवेलमधून पाणी घेणे पापापेक्षा कमी नाही, पाण्यासाठी हाहाकार माजेल -उच्च न्यायालय
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2025 09:47 IST2025-04-14T09:46:43+5:302025-04-14T09:47:06+5:30
Water Shortage High Court News: न्यायालय म्हणाले, जोहान्सबर्गमध्ये काय झाले होते, तुम्हाला माहीत नाही का? काही वर्षांपूर्वी त्या शहरात अनेक महिने पाणी नव्हते.

अवैध बोअरवेलमधून पाणी घेणे पापापेक्षा कमी नाही, पाण्यासाठी हाहाकार माजेल -उच्च न्यायालय
नवी दिल्ली : अवैध बोअरवेलमधून पाणी घेणे पाप करण्यापेक्षा कमी नाही. असे करणाऱ्यांना रोखले पाहिजे. असे अवैध बोअरवेल बंद केले नाहीत, तर दिल्लीत दक्षिण आफ्रिकेच्या जोहान्सबर्ग शहरासारखी स्थिती होऊ शकते. तेथे पाण्यासाठी हाहाकार माजला होता, अशा शब्दांत दिल्ली उच्च न्यायालयाने फटकारले आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
मुख्य न्या. डी. के. उपाध्याय व न्या. तुषार राव गेडेला यांच्या पीठाने ९ एप्रिल रोजी म्हटले आहे की, 'अवैध बोअरवेल ज्या प्रकारे जलस्तर कमी करीत आहेत, ते पापापेक्षा कमी नाही. जोहान्सबर्गमध्ये काय झाले होते, तुम्हाला माहीत नाही का? काही वर्षांपूर्वी त्या शहरात अनेक महिने पाणी नव्हते. त्यांना मोठ्या जलसंकटाला सामोरे जावे लागले होते. दिल्लीत तशीच स्थिती यावी, अशी आपली इच्छा आहे का? निर्माणकार्यांसाठी बोअरवेलची परवानगी कशी देऊ शकता?'
ॲड. सुनील कुमार शर्मा यांच्या याचिकेवर सुनावणी सुरू आहे.
अद्याप कारवाई नाहीच...
याचिकाकर्त्याचे म्हणणे आहे की, रोशनआरा भागातील एका निर्माणाधीन इमारतीमध्ये अनेक बोअरवेल किंवा सबमर्सिबल पंप अवैधरीत्या घेण्यात आले आहेत.
इमारतीचा मालक या भूखंडावर सुमारे १०० फ्लॅट उभारत आहे. माहिती अधिकारात येथे सहा बोअरवेल लावण्याचे महापालिकेने सांगितले.
बोअरवेलमुळे या भागातील रहिवाशांना मोठी झळ सोसावी लागत आहे. त्याचबरोबर पर्यावरणाचेही नुकसान
होत आहे. याबाबत अधिकाऱ्यांना निवेदन दिले तरी अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आली नाही.