नवी दिल्ली – १५ ऑगस्टला एकीकडे भारत स्वातंत्र्य दिनाचा जल्लोष करत होतं त्याचवेळी अफगाणिस्तानवर (Afghanistan) तालिबाननं(Taliban) कब्जा केला. अफगाणिस्तानच्या राजधानी काबुलमध्ये हल्ला करत तालिबानींनी संसद आणि राष्ट्रपती भवन ताब्यात घेतले. काबुलवर हल्ला होण्यापूर्वीच राष्ट्रपती अशरफ घनी देश सोडून पळाले. अफगाणी सैन्यांनी शरणागती पत्करली त्यामुळे तालिबानींनी २ आठवड्यात अफगाणिस्तानवर कब्जा मिळवला.
अफगाणिस्तानच्या परिस्थितीवर भारत लक्ष ठेऊन आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी(PM Narendra Modi) यांनी परराष्ट्र मंत्रालयाला सांगितले की, संसदेच्या दोन्ही सभागृहातील सर्व राजकीय पक्षातील खासदारांना अफगाणिस्तानशी निगडीत सर्व घटनाक्रमाची माहिती द्यावी. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी ट्विट करुन हे सांगितले आहे. पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र खात्याला निर्देश दिलेत की, संसदेच्या दोन्ही सभागृहातील राजकीय पक्षांच्या खासदारांना अफगाणिस्तानच्या परिस्थितीची माहिती द्यावी. याबाबत पुढील माहिती संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी यांच्याकडून दिली जाईल असं त्यांनी सांगितले.
भारत सध्या अफगाणिस्तानात अडकलेल्या भारतीय नागरिक आणि अफगाणींना काढण्यासाठी प्रत्येक प्रयत्न करत आहेत. काबुलहून दर दिवशी २ उड्डाणं करण्याची भारताला परवानगी आहे. अफगाणिस्तानातील हिंदू, शिख यांच्यासोबत अफगाणी मदतनीसांना बाहेर काढण्यासाठी भारत प्रयत्नशील आहे. ज्यांना मदतीची गरज आहे भारत करेल असं आश्वासन केंद्र सरकारकडून देण्यात आले आहे. तत्पूर्वी काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी(Rahul Gandhi) यांनी अफगाणिस्तानच्या परिस्थितीवर केंद्र सरकार विरोधकांशी संवाद का साधत नाही असा प्रश्न केला होता. त्यानंतर आता केंद्र सरकार या प्रकरणी पाऊल उचलत आहे.
२६ ऑगस्टला सर्वपक्षीय बैठक
सूत्रांच्या माहितीनुसार, अफगाणिस्तान प्रकरणात सर्वपक्षीय बैठक परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी गुरुवारी २६ ऑगस्ट सकाळी ११ वाजता बोलावली आहे. मंत्री प्रल्हाद जोशी या बैठकीचं समन्वयक म्हणून काम करत आहेत. रविवारी भारताचं सी १७ विमान १६८ लोकांना अफगाणिस्तानातून भारतात घेऊन आलं आहे. यात १०७ भारतीयांचा समावेश आहे. तसेच अफगाणिस्तानातील दोन अफगाण शिख नेते अनारकली होनारयार आणि नरेंद्र सिंह खालसा यांनाही भारतात आणलं आहे. तसेच ३ अन्य विमानातूनही अफगाणिस्तानातून भारतीयांना परत आणण्यात येत आहे.
गेल्या २४ तासांत ३९० भारतीयांची काबुलहून सुटका
गेल्या २४ तासांत एकूण ३९० भारतीयांची काबुलहून सुखरूपरित्या सुटका करण्यात आली आहे. आज सकाळी १६८ जणांना घेऊन हवाई दलाचं विमान गाझियाबादमध्ये दाखल झालं आहे. तर ८७ जणांना घेऊन येणारं एअर इंडियाचं विमान आज दिल्ली विमानतळावर दाखल होणार आहे. याआधी १३५ जणांची सुटका करण्यात आली होती. अफगाणिस्तानमध्ये अडकलेल्या सर्व भारतीयांना सुखरूपपणे मायदेशी आणण्याकडे भारतीय परराष्ट्र मंत्रालय अतिशय काटेकोरपणे लक्ष ठेवून असल्याचं मंत्रालयाकडून सांगण्यात आलं आहे.