ऑनलाइन लोकमत
श्रीनगर, दि. 27 - तालिबान ज्याप्रमाणे शिक्षणाला विरोध करण्यासाठी कट-कारस्थान रचत असतं तसंच काहीसं काश्मीरमधील दहशतवादी करताना दिसत आहेत. काश्मीरमधील शाळा पुर्णपणे बंद राहाव्यात यासाठी शाळेच्या इमारती उद्ध्वस्त केल्या जात आहेत. सरकारी आकड्यांनुसार गेल्या तीन महिन्यात एकूण 17 सरकारी आणि तीन खासगी शाळा पुर्णपणे उद्ध्वस्त करण्यात आल्या आहेत.
8 जुलै रोजी हिजबूल मुजाहिद्दीनचा कमांडर बु-हान वानीची हत्या झाल्यापासून काश्मीर खो-यातील शाळा बंद आहेत. खो-यातील तब्बल 20 लाख विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यापासून रोखलं जात असल्याची माहिती अधिका-यांनी दिली आहे. सीमारेषेवर स्थित काश्मीरमधील गुरेज, टंगधर आणि उरी तर जम्मू आणि लदाखमधील विद्यार्थ्यांची शाळा मात्र नियमित सुरु आहे.
काश्मीर खो-यात फुटीरतावाद्यांचा इतका प्रभाव नाही आहे. पाकिस्तान समर्थकांनी मंगळवारी दोन सरकारी शाळांना आग लावली. शाळा पुन्हा सुरु करण्याचा प्रयत्न करणारे जम्मू काश्मीरचे शिक्षण मंत्री अख्तर यांना तर दहशतवादी संघटना लष्कर-ए-तोयबाने धमकी दिली होती. 'आपल्यासाठी काय चांगलं आणि वाईट समजण्याइतपत काश्मीरमधील लोक समजूतदार आहेत. जर अख्तर यांनी माघार घेतली नाही तर त्यांच्याविरोधात आम्हाला कारवाई करावी लागेल', अशी धमकी लष्कर-ए-तोयबाच्या प्रवक्त्यांनी दिली होती.
शैक्षणिक संस्था चालू द्याव्यात यासाठी अख्तर यांनी फुटीरतावादी नेते सय्यद अली शाह गिलानी यांच्याकडे विनंती केली होती मात्र त्याचा काही फरक पडला नाही. शैक्षणिक नुकसान होत असल्याने अनेकांनी आपल्या मुलांना शिक्षणासाठी जम्मू आणि दिल्लीला पाठवलं आहे.