काबूल/नवी दिल्ली:तालिबाननंअफगाणिस्तानवर आपली पकड घट्ट करणं सुरू केली आहे. आता लवकरच अफगाणिस्तानमध्येतालिबानची सत्ता असेल. दरम्यान, तालिबानची सत्ता आल्यानंतर देशाचं नेतृत्व कोण करेल, यावर अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत. तालिबानच्या नेतृत्व पदाच्या यादीमध्ये एक नाव आहे, ते म्हणजे शेर मोहम्मद अब्बास स्टनिकझाई याचं. हा तालिबानच्या टॉप कमांडरपैकी आहे. पण, तुम्हाला माहिती आहे का, या शेर मोहम्मदच शिक्षण भारतामध्ये झालं आहे.
टाइम्स ऑफ इंडियाच्या बातमीनुसार, तालिबानच्या 7 सर्वात शक्तिशाली नेत्यांपैकी शेर मोहम्मद अब्बास स्टनिकझाई हा देहरादून येथील इंडियन मिलिट्री अकॅडमी (IMA) मध्ये जेंटलमन कॅडेट होता. आर्मीच शिक्षण शेर मोहम्मदनं भारतात घेतलं आहे. आयएमएच्या 1982 च्या तुकडीतील 60 वर्षीय स्टॅनिकझाईला त्याच्या साथीदारांनी 'शेरू' असं नाव दिलें होतं.
'स्टनिकझाईचे विचार धर्मांध नव्हते'
आयएमएच्या त्या तुकडीतील त्याचे सोबती सांगतात की, स्टनिकझाई तेव्हा धर्मांध किंवा धार्मिक विचारांचाही नव्हता. भगत बटालियनच्या कॅरेन कंपनीत 45 जेंटलमॅन कॅडेट्ससह IMA मध्ये आला तेव्हा स्टॅनिकझाई अवघा 20 वर्षांचा होता. निवृत्त मेजर जनरल डीए चतुर्वेदी हे त्याचे बॅचमेट होते. ते सांगतात की, “स्टनिकझाई प्रत्येकाला आवडायचा, तो एकदम मनमिळावू होता. त्याला मोठ्या मिशा होत्या, त्यामुळे तो अकादमीच्या इतर कॅडेट्सपेक्षा मोठा दिसायचा. त्यावेळी त्यांचे विचार धर्मांध नव्हते. तो इतर अफगाणी कॅडेटसारखा होता,”अशी माहिती त्यांनी दिली.
तालिबान राजवटीत महत्त्वाची पदे भूषवली
स्टनिकझाईने मागील तालिबान राजवटीत परराष्ट्र व्यवहार मंत्री म्हणून काम पाहिले आहे. तसेच, तालिबानच्या वतीने राजनैतिक चर्चेसाठी बिल क्लिंटन यांची भेटही घेतली आहे. 2015 मध्ये स्टनिकझाईची कतारमधील तालिबानच्या राजकीय कार्यालयाचा प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली. स्टनिकझाई उच्च शिक्षित असल्यामुळे तालिबानमध्ये त्याला महत्त्वाचे स्थान देण्यात आले आहे.