दिल्ली विधानसभा निवडणुकांमध्ये केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील आम आदमी पार्टीने ‘झाड’ून साऱ्यांना बाजूला करीत देशाच्या राजधानीत आपले निशान पुन्हा एकदा डौलाने फडकावले आहे. गेल्या सहा वर्षांपासून केंद्रात सत्तेत असणाºया भाजपने रथीमहारथींना प्रचारात उतरवून भावनिक अस्मितेच्या मुद्द्यांवर निवडणूक जिंकण्याचा जुनाच डाव खेळला; परंतु जनतेने त्यांना पूर्णपणे नाकारले. केवळ विकासकामांच्या जोरावर ‘आप’ने ही निवडणूक जिंकल्याने देशात एक नवा आशावाद निर्माण झाला आहे, यावर वाचकांचे एकमत आहे. भाजप चाल बदलेल का, यावर मात्र मतमतांतरे आहेत.
भाजप भूमिका बदलणार नाहीदिल्ली विधानसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर भाजप आपली भूमिका बदलेल असे अजिबात वाटत नाही. भाजप या देशात दीर्घकालीन रणनीतीवर काम करत आहे. हिंदुत्वाच्या आवरणाखाली त्यांना विषमतेचा पुरस्कार करणारी वैदिक व्यवस्था म्हणजेच भेदभावावर आधारलेली मनुस्मृतीप्रणित व्यवस्था इथे आणायची आहे. विरोधक आणि अल्पसंख्याकांच्याबद्दलचा खोटा, विखारी व आक्रमक प्रचार त्यातून येत असल्याने ते त्यापासून दूर जातील हे संभवत नाही. याच कारणाने समतेच्या व धर्मनिरपेक्षतेच्या तत्वाचा पुरस्कार करणारे तसेच सर्वसमावेशक विकासासाठी समान संधीचा आग्रह धरणारे भारतीय संविधान त्यांना मनापासून मान्य नाही. अर्थात त्यांची जाहीर भाषा वेगळी असते. दुसरे म्हणजे आर्थिक आघाडीवर भारताची पिछेहाट सुरु आहे. बेरोजगारी वाढतेय. उद्योग मंदावले. शेतीक्षेत्र कोमेजून गेले. या आर्थिक अरिष्टातून भारताला बाहेर काढण्यासाठीचा आर्थिक कार्यक्रम त्यांना मान्य नसल्याने त्यांचा प्रचार पुन्हा नकली राष्ट्रवादाच्या भोवतीच फिरण्याची जास्त शक्यता आहे. कदाचित नागरिकांना व विरोधकांना गोंधळात टाकण्यासाठी ते तात्पुरते वेगळे बोलतीलही मात्र त्यांच्या मूळ भूमिकेपासून ते दूर जाण्याची शक्यता दिसत नाही.द्वेषाचा प्रचार उपयोगी पडला नाहीदिल्लीतील निवडणुकीमध्ये ‘देश के गद्दारोंको गोली मारो, सालों को,’ ही वापरलेली भाषा, हा द्वेषाचा प्रचार उपयोगी पडला नाही. हिंदू विभाजन करता आले नाही. राष्ट्रभक्ती, रामभक्ती, पाकिस्तानधार्जिणे, अतिरेकी असे शत्रूभाव सहज वाढविणारी भाषा ही संपूर्ण भारतात व जगभर बदनाम ठरली आहे. हे भाजपा आयटी सेलने दाखवून दिलेले निरीक्षण भाजपा मॅरेथॉन मंथन बैठकीत मान्य करते, हा तात्पुरता कावा आहे.दिल्ली विधानसभा निवडणुकीत वीररस, द्वेष, शत्रूता अशी सगळी अस्त्रे वापरुन प्रचार केल्यास जगभरामध्ये हलकल्लोळ होईल म्हणून केंद्रातील भाजपने संघ विचार सूत्राप्रमाणे ‘किलिंग इज नॉट मर्डर’ असा नवा पवित्रा घेतला आहे. आगामी भारतीय राजकारणात देशद्रोही, आतंकवादी, गद्दार ही भाषा वापरून भय तयार करून जनता विभाजित करून, राम नाम जप करूनही यश मिळणार नाही अशा निष्कर्षाप्रती आपण आलो आहोत, हे दाखविण्यासाठी भाजपची नवी चुचकारणारी भाषा सुरू होणार, असे दिसते.भाजपाचे सर्वेसर्वा अमित शाह यांची मंथन बैठकीतील नाराजी ही भाजपाचे हिंसा, हिंदुत्व ही उदारतेच्या दिशेने जात आहे का डावपेच आहेत की पराभव पचवण्यासाठीचा उपाय आहे. अरविंद केजरीवाल यांचे ‘आप’चे दिल्लीतील सरकार हटविता आले नाही. देशभरातील असंतोष व विरोधाची तीव्रता कमी करण्याचा मार्ग आहे, असे निरीक्षण व मत नोंदविणे अत्यावश्यक वाटते. कारण दिल्लीचे नवे मुख्यमंत्री केजरीवाल हे अचाट धाडसाचे, माहितीच्या अधिकार चळवळीतील बंधुभावी नेतृत्व आहेत. त्यांचे स्वागत. तर हिंसा, वीररसाचा देश विभाजित करणाऱ्यांची ही भाषा जनतेने सतत तपासून सनदशीर व राष्ट्रीय वर्तन केले पाहिजे.
- सुभाष वारे, सामाजिक कार्यकर्ते - पुणे