नवी दिल्ली: हमास या दहशतवादी संघटनेने इस्रायलवर केलेल्या दहशतवादी हल्ल्यानतंर जगभरातील देशांमध्ये चर्चा सुरू आहे. या हल्ल्याचा सर्वत्र निषेध सुरू आहे. हमासच्या हल्ल्यात इस्रायलच्या ९०० हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. याच्या प्रत्युत्तरात इस्रायल लष्कराने गाझापट्टी हमासच्या ठिकाणांवर रॉकेट हल्ला केला.
हे युद्ध आम्ही सुरू केले नाही पण आम्हीच हे युद्ध संपवू, असं म्हणत इस्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू यांनी हमासला कडक शब्दात इशारा दिला आहे. अनेक देशांनी हमासच्या हल्ल्यांचा तीव्र निषेध केला आहे. भारतासह अमेरिका, फ्रान्स, ब्रिटन, जर्मनी, इटलीसह जगातील अनेक देशांनी इस्रायलला पाठिंबा देण्याचं आश्वासन दिलं आहे. याचदरम्यान भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इस्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू यांच्यात फोनवरुन चर्चा झाली. नरेंद्र मोदी यांनी याबाबत ट्विट करुन माहिती दिली आहे.
नरेंद्र मोदी म्हणाले की, मी इस्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू यांचे आभार मानतो, की त्यांनी फोनवरुन तेथील सध्याच्या परिस्थितीबद्दल मला माहिती दिली. या कठीण काळात भारतीय जनता इस्रायलच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. भारत दहशतवादाच्या सर्व प्रकारांचा आणि प्रकटीकरणाचा तीव्र आणि निःसंदिग्धपणे निषेध करतो, असं नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, हमासने इस्लाइलवर केलेल्या हल्ल्याचा इस्राइलकडून भयंकर सूड घेतला जात आहे. इस्राइलच्या सैन्याकडून गाझापट्टीवर सातत्याने बॉम्बफेक केली जात आहे. त्यामुळे गाझामध्ये मोठ्या प्रमाणावर जीवित आणि वित्तहानी झाली आहे. इस्राइली सैन्याने हमासचे ४७५ रॉकेट सिस्टिम आणि ७३ कमांड सेंटर उद्ध्वस्तकेले आहेत. तसेच इस्राइलच्या हद्दीत घुसलेल्या हमासच्या १५०० दहशतवाद्यांना ठार करण्यात आले असून, त्यांचे मृतदेह इतरत्र पडले आहेत, असा दावा इस्राइलमधील स्थानिक माध्यमांनी केला आहे.
तिन्ही बाजूंनी हल्ले सुरूच-
इस्रायलच्या तिन्ही सैन्याने गाझा पट्टीत हमास या दहशतवादी संघटनेला लक्ष्य केले आहे. जिथे इस्रायली हवाई दल हमासच्या स्थानांवर बॉम्बफेक करत आहे. या बॉम्बहल्ल्यात अनेक मशिदी, निर्वासित शिबिर, हमास कमांड सेंटर आणि इस्लामिक जिहाद कमांड सेंटरवरही बॉम्बस्फोट झाले. इस्रायलने गाझा पट्टीतील शेकडो बहुमजली इमारती उद्ध्वस्त केल्या आहेत.
५०-६० विमाने हवाई हल्ले-
इस्त्रायली हवाई दलाची ५०-६० लढाऊ विमाने हवाई हल्ल्यात सहभागी आहेत. इस्रायली हवाई दलाने आतापर्यंत गाझा पट्टीवर अनेक टप्प्यांत हवाई हल्ले केले आहेत. या कालावधीत १७०० लक्ष्य ठेवण्यात आले होते. युद्धाच्या सुरुवातीपासून, इस्रायली हवाई दलाच्या विमानांनी गाझावर १००० टन पेक्षा जास्त बॉम्ब टाकले आहेत.