ऑनलाइन लोकमत
इस्लामाबाद, दि. २२ - काश्मिर हा भारत पाकिस्तान चर्चेसाठी महत्त्वाचा मुद्दा होता आणि आहे, त्याशिवाय चर्चा होऊ शकत नाही असे स्पष्ट प्रतिपादन पाकिस्तानचे सुरक्षा सल्लागार सरताझ अजिझ यांनी पत्रकार परिषदेत केले आहे. प्रत्येकाला माहीत आहे की काश्मिर हाच भारत पाक चर्चेदरम्यान कळीचा मुद्दा राहिलेला आहे, त्यामुळे त्याचा समावेश उफामधल्या अजेंडामध्ये असो वा नसो त्यानं काय फरक पडतो असा प्रश्न विचारत भारत हा मुद्दा चर्चेत येऊ नये यासाठी प्रयत्न करत असल्याचा आरोप अजिझ यांनी केला आहे.
त्याचप्रमाणे गेल्या अनेक भारत भेटीदरम्यान पाकिस्तानचे नेते हुरियतच्या नेत्यांशी चर्चा करत आले आहेत, त्यामुळे आत्ताच अशा भेटींना विरोध करण्याचे काय कारण आहे असा सवालही अजिझ यांनी विचारला आहे.
जर काश्मिर हा मुद्दा चर्चेत ठेवण्याचा पाकिस्तानचा आग्रह असेल व भारताची तयारी नसेल तर दोन्ही देशांच्या सुरक्षा सल्लागारांची बैठक रद्द होणार का या प्रश्नावर बोलताना, अजिझ यांनी कुठल्याही अटीविना चर्चा होणार असेल तरच भारतात जाणार असल्याचे सांगितले. त्यामुळे भारताने काश्मिर प्रश्न चर्चेत घेण्यास मान्यता दिली तरच ही चर्चा होईल अन्यथा ही भेट रद्द होईल असे संकेत अजिझ यांनी दिले आहेत. मोदी सरकार सत्तेवर आल्यापासून त्यांना त्यांच्या अटी-शर्तींवर पाकिस्तानशी चर्चा करायची आहे, त्यांना वाटतं आम्ही काश्मीरचा मुद्दा सोडून द्यावा, पण हे शक्य नाही, असेही अझिज यावेळी म्हणाले.
दहशतवाद, मच्छिमारांची सुटका, सीमावाद असे अनेक प्रश्न भारत - पाक दरम्यान असले तरी सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा काश्मिर हाच आहे यावर अजिझ यांनी भर दिला आहे.
काश्मिरच्या जनतेला सार्वमताचा अधिकार देणे हा संयुक्त राष्ट्रात असलेला मुद्दा असून जर का हा महत्त्वाचा प्रश्न नसेल तर काश्मिरमध्ये भारताला सात लाख सैन्य का तैनात करायला लागतं असा सवालही अजिझ यांनी केला आहे.
सीनेवर भारताकडून आगळिक होते आणि शस्त्रसंधीचं उल्लंघन होतं असा आरोपही यावेळी पाकिस्तानने केला आहे.