ऑनलाइन लोकमत
लखनऊ, दि. १५ - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी फेसबूकवर कमी बोलावे आणि प्रत्यक्ष कृतीवर भर द्यावा, असा सल्ला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी दिला आहे . ट्विटर, फेसबूक अशा सोशल नेटवर्किंग साईट्सवर अॅक्टिव्ह राहून देशवासियांना सतत वेगवेगळ्या गोष्टींची माहिती देणा-या पंतप्रधान मोदींवर अखिलेश यांनी एका वृत्वाहिनीला दिलेल्या मुलाखतीदरम्यान टीका केली.
पंतप्रधान मोदी यांनी आपला पक्ष व मित्रपक्षातील नेत्यांशी चर्चा करून विकासावर भर देण्यासंदर्भात मार्गदर्शन करावे. मोदींनी फेसबूकवर कमी बोलावे आणि प्रत्यक्ष कृतीवर जास्त भर द्यावा, असे अखिलेश यांनी सांगितले.
उत्तर प्रदेशमधील दादरी येथे बीफ खाल्ल्याच्या अफेववरून एका मुस्लिम नागरिकाची हत्या झाल्यानंतर देशभरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. याविषयी बोलताना अखिलेश यांनी बीफ खाणाऱ्यांना आपला वैयक्तिक विरोध असल्याचे म्हटले. मात्र जगभरात बीफ खाल्ले जात असताना तुम्ही ते बंद करू शकत नाही असे सांगत कोणालाही कायदा हातात घेण्याचा अधिकार नसल्याचे स्पष्ट केले.