नवी दिल्ली: भाजपाच्या खासदार आणि आमदारांनी ऊठसूठ कोणत्याही विषयावर तोंड उघडून माध्यमांना मसाला पुरविण्याचे आणि परिणामी पक्षाला व सरकारला नाहक वाईटपणा आणण्याचे प्रकार बंद करावेत, असा इशारावजा सल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी दिला. नको त्या विषयावर पांडित्य दाखविण्याऐवजी या मंडळींनी ज्यासाठी लोकांनी निवडून दिले आहे, ते आपले लोकसेवेचे काम करावे, असे त्यांनी सांगितले. कर्नाटकसह काही राज्य विधानसभांची आणि पुढील वर्षातील लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून सर्व विरोधक भाजपाच्या विरोधात एकवटण्याचे प्रयत्न करत असताना मोदी यांनी नरेंद्र मोदी अॅपच्या माध्यमातून पक्षाच्या देशभरातील लोकप्रतिनिधींशी संवाद साधत त्यांची सुमारे तासभर शाळा घेतली. त्यांनी पक्षाचे आणि सरकारचे काम तळागळापर्यंत कसे पोहोचवावे हे त्यांना सांगत असतानाच पक्ष आणि सरकार अडचणीत येईल अशी वक्तव्ये करण्याचे त्यांनी कटाक्षाने टाळावे, असेही त्यांना बजावले. याउलट पक्षाच्या लोकप्रतिनिधींनी समाजमाध्यमांचा पुरेपूर वापर करून लोकांपर्यंत पोहोचावे, असे त्यांनी सुचविले.अशा उठसूठ केल्या जाणाऱ्या वक्तव्यांनी पक्ष आणि सरकारसोबत तुमची स्वत:चीही प्रतिमा मलीन करत असता याची जाणीव करून देत मोदी म्हणाले की, पक्षाच्या आठ-दहा आमदारांना अशी सवय असल्याचे मला दिसले. मी व्यक्तिश: त्यांच्याशी बोलल्यावर हा प्रकार बंद झाला होता.मोदींच्या शाळेतील इतर धडे‘सर्वजन हिताय, सर्वजन सुखाय’ हे तत्व लक्षात ठेवून व्यक्तिगत हितासाठी नव्हे तर व्यापक जनहितासाठी सरकारी यंत्रणेची गाडी हाका. तुम्ही व्यक्तिगत हित मध्ये आणलेत तर सरकारी गाडा ठप्प होईल. काँग्रेसच्या चुकांमुळे आपण सत्तेवर आलो हा समज मनातून काढून टाका. पक्षाने, त्याच्या नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी कित्येक वर्षे अपार मेहनेत करून मोठ्या समाजवर्गाशी नाळ जोडली याचे सत्ता हे फलित आहे. पक्षाच्या आता झालेल्या विस्ताराने भाजपा हा फक्त ब्राह्मण-बनियांचा आणि उत्तर भारतापुरता मर्यादित पक्ष आहे हा भ्रम दूर झाला आहे.आपल्या पक्षाकडे सर्वाधिक दलित, आदिवासी व ओबीसी लोकप्रतिनिधी आहेत. त्यांच्या माध्यमांतून आपण या फार मोठ्या समाजवर्गांच्या आशा-आकांक्षांचे प्रतिनिधित्व करतो याचे नेहमी भान ठेवा. १४ एप्रिल ते ५ मे या काळात आपण ग्रामस्वराज अभियान हाती घेतले आहे. त्या काळात पक्षाच्या प्रत्येक आमदार-खासदाराने त्याच्या मतदारसंघातील गावांचे निदान चार-पाच प्रमुख प्रश्न सोडविण्याचा संकल्प करावा.कॅमेरा समोर दिसला की, तज्ज्ञ असल्याच्या आविर्भावात वक्तव्ये करत सुटता...मोदी आमदार-खासदारांना उद्देशून म्हणाले, आपण चुका करतो आणि माध्यमांना विनाकारण मसाला पुरवितो. माइक किंवा कॅमेरा समोर दिसला की, जणू थोर समाजशास्त्रज्ञ किंवा तज्ज्ञ असल्याच्या आविर्भावात आपण वक्तव्ये करत सुटतो... याचा माध्यमे त्यांना हवा तसा वापर करतात. यात माध्यमांची चूक नाही. ते त्यांचे काम करत असतात. त्यांना विनाकारण मसाला न पुरविता, तुम्हीसुद्धा तुमचे काम करा.राळेगणसिद्धीचा आदर्श ठेवा!आमदार-खासदारांनी विचारलेल्या अनेक प्रश्नांना मोदी यांनी उत्तरे दिली व त्यांच्या अनेक शंकांचे निरसनही केले. ग्रामीण भागांतील लोकांचे जीवन सुधारण्यासाठी काय करता येईल, या प्रश्नाच्या उत्तरात त्यांनी अण्णा हजारे यांच्या राळेगणसिद्धीया गावाचा आदर्श डोळ्यासमोर ठेवण्याचा सल्ला दिला. गावकऱ्यांनी एकदिलाने एकत्र येऊन काम केले, तर गाव कसे आदर्श होऊ शकते, याचे राळेगण हे उदाहरण आहे, असे ते म्हणाले.
तोंड आवरा, माध्यमांना मसाला देऊ नका!, मोदींचा भाजपा नेत्यांना इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2018 2:48 AM