हरीश गुप्ता, नवी दिल्लीपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी सुमारे ८० केंद्रीय सचिवांशी प्रदीर्घ संवाद साधत प्रशासनासंबंधी त्यांच्या नव्या कल्पना, सूचना आणि शिफारशी ऐकून घेतल्या. सचिवांनी तयार केलेल्या विविध गटांकडून सादरीकरण करण्यात आले.नव्या ऊर्जासंवर्धन इमारतींच्या बांधकामातून एक लाख कोटी रुपयांची बचत केली जाऊ शकते. जुन्या वाहनांवर कर आकारल्यास २४ हजार कोटी रुपयांची कमाई केली जाऊ शकते, अशा प्रकारच्या सूचनांचाही त्यात समावेश होता. ३१ डिसेंबर रोजी मोदींनी सर्वप्रथम सचिवांशी संवाद साधला होता. नव्या कल्पना व सूचना सादर करण्यासाठी अधिकाऱ्यांना पंधरवड्याची मुदत दिल्यानंतर मोदींनी तिसऱ्यांदा त्यांच्याशी संवाद साधत सातत्य कायम राखले. ८० सचिवांचा सहभागएकूण ८० सचिवांचे ८ गट पाडण्यात आले असून, त्यांनी वेगवान प्रशासन, रोजगारनिर्मिती तसेच कृषी आणि संलग्न क्षेत्राबाबत वेगवेगळ्या सूचना केल्या आहेत. रविवारचे सादरीकरण स्वच्छ भारत आणि शिक्षित भारत या संकल्पनेपुरते मर्यादित होते. यावेळी केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंग, संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर, नीती आयोगाचे उपाध्यक्ष अरविंद पनगढिया, मंत्रिमंडळ सचिव पी.के. सिन्हा आदींची उपस्थिती होती. अर्थसंकल्पाच्या नियोजनबाबत विशेष सत्र होणार असल्याची माहिती मिळाली आहे.