बंगळुरू : कर्नाटक विधानसभा निवडणुकीतील आपल्या पहिल्याच प्रचारसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि कर्नाटकातील विद्यमान सिद्धरामय्या सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले. संसदेत १५ मिनिटे बोलण्याची मुभा द्या, पंतप्रधान मोदींचे तोंड बंद करू, असे आव्हान राहुल गांधी यांनी दिले होते. त्यावर कागदाचा एकही तुकडा न घेता, इंग्रजी, हिंदी अथवा तुमच्या मातृभाषेत फक्त १५ मिनिटे भाषण करून दाखवा, १५ मिनिटेच राज्य सरकारच्या कामाबाबत माहिती द्या, असे खुले आव्हानच मोदी यांनी राहुल गांधींना दिले.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारपासून कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात केली. कर्नाटकातील चामराजनगरमधील संथारामहळ्ळी येथील प्रचारसभेत त्यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर घणाघाती शब्दांत टीका केली. या सभेला लोकांनी मोठी गर्दी केली होती. गेल्या काही दिवसांपासून राहुल गांधी यांनी सातत्याने मोदी यांच्यावर टीका केली होती. त्यांच्या टीकेचा समाचार घेत, मोदी यांनी काँग्रेसच्या घराणेशाहीच्या राजकारणावर टीका केली. मोदी म्हणाले की, काँग्रेसचे अध्यक्ष मला आव्हान देतात की, ते १५ मिनिटे बोलले तर मोदी बसू शकणार नाहीत, पण त्यांनी १५ मिनिटे बोलणे हीच मोठी गोष्ट आहे. तुम्ही नामदार आहात आम्ही तर कामदार आहोत. तुम्हाला ज्या भाषेत बोलायचे आहे, त्या भाषेत हातात कागद न घेता, कर्नाटक सरकारच्या कामगिरीबाबत जनतेत बोला. फक्त १५ मिनिटे कर्नाटक सरकारने केलेल्या कामांबद्दल जनतेसमोर बोलून दाखवा. १५ मिनिटांच्या भाषणात किमान पाच वेळा विश्वेसरैयांचे नाव घ्या. इतके केले, तरी तुमच्या बोलण्यात किती ताकद आहे, हे कर्नाटकातील जनता ठरवेल.ज्यांना देशाचा इतिहास माहीत नाही, ह्यवंदे मातरम्ह्ण माहीत नाही, असे लोक सध्या राजकारण करीत आहेत, असे म्हणत, मोदी यांनी राहुल गांधींना टोला लगावला. काही दिवसांपूर्वी राहुल गांधी यांनी ह्यवंदे मातरम्ह्ण एका ओळीत संपवा, असे म्हटले होते. त्याचा समाचार मोदींना घेतला.याशिवाय कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांवरही मोदींनी हल्लाबोल केला. पराभवाला घाबरून मुख्यमंत्री सिद्धरामय्या दोन मतदार संघातून लढत आहेत. घराणेशाहीमुळे देशातील राजकारण खराब झाल्याचा आरोप त्यांनी केला. या सरकारशी निगडित प्रत्येक व्यक्तीच्या भ्रष्टाचाराचे वृत्त आले आहे. कर्नाटकात ना लॉ आहे ना आॅर्डर आहे, असा टोलाही लगावला.
कागदाशिवाय १५ मिनिटे बोलून दाखवावे, नरेंद्र मोदी यांचे राहुल गांधी यांना आव्हान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 02, 2018 5:45 AM