- सद्गुरु पाटील, पणजी
गोव्याच्या किनारपट्टी भागात लाखोंच्या संख्येने असणाऱ्या लमाणी जमातीमधील लोकांना हाकलून लावायला हवे, अशा प्रकारची भूमिका सरकारमधील काही घटकांनी घेतल्यानंतर वाद निर्माण झाला आहे. गोव्याच्या पर्यटन क्षेत्रात त्यामुळे मोठी अस्वस्थता भरून राहिली आहे.किनाऱ्यांवर फिरून पर्यटकांना छोट्या वस्तूंची विक्री करण्याचे काम लमाणी करतात. गोव्याचे पर्यटन मंत्री बाबू आजगावकर यांनी त्यास जाहीरपणे आक्षेप घेतला व पर्यटन खात्याला आणि पोलिसांनाही याविरुद्ध कारवाई करण्याचे आदेश त्यांनी दिले. गोव्यातील लमाण्यांचे बेकायदा धंबे बंद करा व त्यांना हाकला अशा प्रकारचे विधान मंत्री आजगावकर यांनी केल्यानंतर लमाणी जमातीमध्ये भीती आहे. पोलिसांनी व पर्यटन खात्याच्या अधिकाऱ्यांनी मिळून बेकायदा धंदा करणाऱ्या लमाण्यांना पकडण्याची व त्यांचे सामान जप्त करण्याची मोहीम सुरू केल्याने वादात भर पडली.गोवा बंजारा समाज या लमाणी जमातीचे प्रतिनिधित्व करणाऱ्या समाजाने सरकारवर टीका केली आहे. कुणाही व्यक्तीने बेकायदा धंदा केल्यास कारवाई करण्याची भूमिका सरकारने घ्यावी, अशी मागणी बंजारा समाजाने केली आहे. नायजेरीयन नागरिकांकडून अनेक बेकायदा धंदे केले जात आहेत. त्यांच्याविरुद्ध सरकारने कारवाई करावी, असे आव्हानही बंजारा समाजाने दिले. उगाच लमाण समाजाला दोषी ठरवून त्यांना लक्ष्य बनविले जात असल्याचे बंजारा समाजाने म्हटले आहे. पर्यटन मंत्री आजगावकर यांनी माफी मागावी, अशी मागणी समाजाच्या नेत्यांनी केली आहे. मंत्री आजगावकर यांनी मात्र आपण माफी मागणार नाही. बेकायदा धंद्यांविरुद्ध कारवाई केली जाईल. किनारपट्टीतील व्यवसायामुळे पर्यटकांना उपद्रव होतो, असे आजगावकर म्हणाले.दुसरीकडे किनारपट्टीतील लमाण्यांच्या व्यवसायाविरुद्ध शासकीय यंत्रणेने कारवाई सुरूच ठेवली आहे. पर्यटन खात्याचे संचालक संजीव गांवस देसाई यांच्या मते आता किनाऱ्यांवरील लमाणी लोकांचे बेकायदा धंदे बंद झाले आहेत. समाजातील विविध घटकांच्या वाढत्या टीकेमुळे सत्ताधारी भाजपा थोडा दबावाखाली आला आहे. पक्षाचे प्रवक्ते आ. मायकल लोबो, दत्तप्रसाद नाईक व हेमंत गोलतकर या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेऊन किनारपट्टीत लमाण्यांवर नव्हे तर फिरत्या विक्रेत्यांवर बंदी घालण्याची गरज असल्याचे सांगितले.आम्ही लमाण्यांचा आदर करतो. सरकारच्यावतीने आम्ही माफी मागतो, असे सत्ताधारी पक्षाचे नेते मायकल लोबो यांनी सांगितले. मी लमाणी समाजाच्या विरोधात नाही. मी देखील तळागाळातूनच संघर्ष करत आलो आहे. लमाण्यांनीही कायदेशीर पद्धतीने व्यवसाय करावा, सरकारचा त्यास आक्षेप नसेल. किनाऱ्यांवर काहीजण दिवसभर फिरत राहतात व छोटे व्यवसाय करण्याच्या नावाखाली चरस, गांजा वगैरे विकतात. अमली पदार्थांमुळे गोव्याची युवा पिढी बरबाद होत आहे. - बाबू आजगावकर, पर्यटन मंत्री.