देशात काही दिवसातच लोकसभा निवडणुका होणार असून सर्व पक्षांनी तयारी सुरू केली आहे. दरम्यान, पंजाबमध्ये भाजप आणि अकाली दल यांच्यात युतीबाबत चर्चा सुरू होती. याबाबत आता एक मोठी अपडेट समोर आली आहे, भाजप आणि अकाली दल यांच्यातील चर्चा निष्फळ ठरली आहे. लोकसभा निवडणुकी आधी एनडीए विस्तार करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहे. या पार्श्वभूमीवर भाजप आणि अकाली दल यांच्यात पंजाबमध्ये युतीबाबत काही काळ चर्चा सुरू होती.
राहुल गांधींची 'भारत जोडो न्याय यात्रा' नियोजित वेळेपूर्वी संपणार? कारण...
आम आदमी पक्ष आणि काँग्रेसने पंजाबमध्ये एकत्र निवडणूक न लढवण्याची घोषणा केल्यानंतर भाजपने आपली रणनीती बदलली आहे. शेतकरी आंदोलन आणि शीख कैद्यांच्या सुटकेबाबत अकाली दल भाजपवर दबाव टाकत आहे. याशिवाय पंजाबचे भाजप नेतृत्वही युतीच्या बाजूने नव्हते. यामुळे ही युतीची चर्चा निष्फळ ठरली असल्याचे बोलले जात आहे.
केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी नवे कृषी कायदे आणले होते, तेव्हा अकाली दलाने त्याचा विरोध करत एनडीएतून बाहेर पडले होते. त्यानंतर अकाली दलाने बहुजन समाज पक्षासोबत युती करून पंजाब विधानसभेची निवडणूक लढवली.
भाजप पंजाबमधील लोकसभेच्या १३ पैकी ६ जागांवर निवडणूक लढवण्याची मागणी करत आहे, तर अकाली दल इतक्या जागा देण्यास तयार नाही. अकाली दल जेव्हा एनडीएचा भाग होता तेव्हा तो १० जागांवर निवडणूक लढवत होते आणि भाजप तीन जागांवर निवडणूक लढवत होती. सध्या पंजाबमध्ये अकाली दल आणि बहुजन समाज पक्ष यांच्यात युती आहे. पंजाबमध्ये बसपचा चांगला प्रभाव असल्याने त्यांना ही युती तोडायची नसल्याचे बोलले जात आहे. सुखदेव सिंह धिंडसा यांचा गटही अकाली दलात सामील झाल्याची चर्चा आहे. त्याचवेळी भाजपने पंजाबमध्ये अकाली दलाला कमकुवत करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप अकाली नेत्यांनी केला आहे.