मुंबई- कला, संस्कृती, साहित्य आणि समाजसेवा या क्षेत्रांतून राष्ट्रपतींच्या द्वारे राज्यसभेवर जाणा-या 12 व्यक्तींपैकी तीन जणांचा कार्यकाळ एप्रिल महिन्यात संपणार आहे. विशेष म्हणजे या तिन्ही जागा मुंबईतून आहेत. व्यावसायिक अनू आगा, क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर आणि चित्रपट अभिनेत्री रेखा सध्या या तीन जागी राज्यसभेत आहेत. आता या तीन जागांसाठी होणा-या निवडीवरून चित्रपट क्षेत्रातील व्यक्तींसह लेखकांमध्ये आतापासूनच चढाओढ सुरू झाली आहे.संसदेत सर्वात खराब कामगिरी असल्यानं रेखावर ब-याचदा टीका केली जाते. रेखासह तिघांचा एप्रिलमध्ये राज्यसभेच्या सहा वर्षांचा कार्यकाळ पूर्ण होणार आहे. आता रेखाच्या जागी राष्ट्रपतींच्या कोट्यातून कोणाला उमेदवारी मिळणार आहे, याची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. रेखाच्या जागी खासदार होण्यासाठी चित्रपट क्षेत्रातील अनेकांनी मोर्चेबांधणी करण्यास सुरुवात केली आहे. ब-याच जणांनी भाजपाध्यक्ष अमित शाहांकडे या जागेसाठी बोलणी केली आहेत. तसेच काहींनी मंत्र्यांच्या माध्यमातून स्वतःचा वशिला लावण्याचा प्रयत्न केला आहे.सूत्रांच्या माहितीनुसार, या जागेसाठी अक्षय कुमार, जुही चावला आणि गजेंद्र चौहान यांच्या नावांची चर्चा आहे. तर दुसरीकडे सलमान खानचे वडील सलीम खान, विवेक ओबेरॉयचे वडील सुरेश ओबेरॉय, ऋषी कपूर, जॅकी श्राफ, वहिदा रहमान, आशा पारेख, मधुर भांडारकर आणि अनुपम खेर यांच्या नावांची शिफारसही पक्षाकडे करण्यात आली आहे. यूपीए सरकारमधल्या एका वजनदार खासदाराच्या आग्रहाखातर रेखा राज्यसभेत जाण्यास तयार झाल्या होत्या. त्या खासदाराला जया बच्चन यांच्याविरोधात रेखाचा वापर करायचा होता. परंतु त्या खासदाराची ही योजना पुरती बासनात गुंडाळली गेली आहे. पंतप्रधान योजनांशी जोडलेले अक्षय कुमार प्रबळ दावेदारमहिलांसाठी शौचालय निर्माण, पंतप्रधान स्वच्छता अभियान आणि शहीद जवानांना मदत करण्यासाठी अक्षय कुमार नेहमीच पुढे असतो. रेखासोबत काम केलेला अक्षय कुमारही राज्यसभेत जाऊ शकतो. तसेच त्यांच्या कॅनडियन नागरिकत्वाची कोणतीही अडचण आल्यास त्याची पत्नी डिंपल कपाडिया हिचाही विचार होऊ शकतो. ती अल्पसंख्याक समुदायातून येते. तर गजेंद्र चौहान यांनाही संधी मिळू शकते. गजेंद्र चौहान हे संघ परिवाराच्या जवळचे आहेत.
रेखाच्या राज्यसभेच्या जागेवरून चढाओढ, अक्षय कुमार, जुही व गजेंद्र चौहानांची चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2018 9:01 AM