लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली: आता पाकिस्तानातील खासदारही भारत वेगाने महाशक्ती बनत असल्याचे मान्य करत आहेत. मात्र, ते स्वत: कंगाल होण्यापासून वाचण्यासाठी जगाकडे भीक मागत आहेत, असे केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटले आहे. त्यांनी चीनच्याभारतीय भूमीवरील कथित घुसखोरीबाबत देशातील विरोधी पक्षांचे आरोप फेटाळून लावले. देशाची एक इंचही जमीन कोणीही बळकावू शकत नाही, असे राजनाथ म्हणाले.
देशाची एक इंचही जमीन...
- संरक्षणमंत्री म्हणाले की, भाजपने आजपर्यंत देशाच्या सैनिकांच्या धैर्यावर आणि शौर्यावर कधीही प्रश्नचिन्ह उपस्थित केलेले नाही; पण विरोधी पक्ष तसे प्रश्न नेहमीच विचारतात.
- संरक्षणमंत्री या नात्याने मी तमाम नागरिकांना आश्वस्त करू इच्छितो की, देशाची एक इंचही जमीन कोणीही बळकावू शकत नाही.’ याआधीही अनेक वेळा केंद्र सरकारने चीनने भारताची जमीन बळकावल्याचा विरोधकांचा दावा फेटाळून लावला आहे.
...तर लोकांना अभिमान वाटेल
भारत-चीन सीमावादावर संरक्षणमंत्र्यांनी एक मोठे विधान केले. ते म्हणाले की, सध्या भारत आणि चीनमध्ये कमांडर स्तरावरील चर्चा चांगल्या वातावरणात होत आहे आणि मला वाटते की, आपण निकालाची वाट पाहिली पाहिजे. परंतु मी कोणत्या टप्प्यावर काय आहे, यावर चर्चा करू लागलो, तर देशातील लोकांना नक्कीच अभिमान वाटेल; पण मला आता काही उघड करायचे नाही. दोन्ही देशांमध्ये सध्या चर्चा सुरू असल्याने तपशील अद्याप निश्चित करणे बाकी आहे, असे संरक्षणमंत्री म्हणाले.