सुरेश भटेवरा,नवी दिल्ली- गुजरातमध्ये नर्मदा नदीवर भडोचमध्ये बांधलेल्या देशातील सर्वाधिक लांबीच्या केबल ब्रिजचे उद्घाटन पंतप्रधान मोदींच्या हस्ते मंगळवारी होणार आहे. १३४४ मीटर लांब व २0.८ मीटर्स रुंदीच्या या केबल पुलाचे काम २ वर्षांत पूर्ण झाले असून त्यासाठी ३७९ कोटींचा खर्च झाला आहे. या चार लेनच्या पुलावरील वाहतूक सुरू होताच, मुंबई अहमदाबाद महामार्गावर भडोच येथे होणारी वाहतूक कोंडी दूर होईल.मुंबईतल्या वरळी-वांद्रे येथील सी लिंक पुलासारखा दिसणारा हा भव्य केबल ब्रिज इंग्रजी वाय आकाराच्या १0 स्तंभाह्णवर उभा असून प्रत्येक स्तंभ १८ मीटर्स उंचीचा आहे. मोदी पंतप्रधान झाल्यावर आॅक्टोबर २0१४ मेमध्ये पुलाचे काम सुरू झाले. स्ट्रेच तंत्रज्ञानानुसार एकुण २१६ केबल्स या पुलासाठी वापरल्या आहेत. प्रत्येक केबलची लांबी २५ ते ४0 मीटर्सच्या दरम्यान आहे. १७.४ मीटर रुंदीच्या ४ लेन रस्त्यासह ३ मीटर्स रुंदीचे भव्य फुटपाथ पुलाच्या दोन्ही बाजूला आहेत. पुलावर ४00 पेक्षा अधिक एलईडी दिव्यांची रोषणाई आंतरराष्ट्रीय दर्जानुसार करण्यात आली आहे. पंतप्रधान मोदी मंगळवारी दुपारी सुरत विमानतळावर व तेथून भडोचच्या दहेजला पोहोचतील. दहेजच्या औद्योगिक प्रकल्पाच्या उद्घाटनानंतर सायंकाळी ते पुलाचे उद्घाटन करतील. या प्रसंगी होणाऱ्या सभेत केंद्रीय भूतल परिवहन मंत्री नितीन गडकरी, गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपानी, उपमुख्यमंत्री नितीनभाई पटेल यांची भाषणे होतील. मुख्यमंत्री विजय रूपाणी आणि राज्यपाल पी. कोहली आयोजित स्नेहभोजनाला मंगळवारी रात्री पंतप्रधान उपस्थित रहातील. बुधवारी ते दीव बेटावर जातील. सोमनाथ मंदिरात ते हेलिकॉप्टरने दिवहून रवाना होतील. पंतप्रधानपद झाल्यानंतर सोमनाथ मंदिराला त्यांची पहिलीच भेट आहे.
देशातील सर्वाधिक लांबीचा केबल ब्रिज भडोचमध्ये
By admin | Published: March 07, 2017 4:01 AM