तामिळनाडूतील कल्लाकुरिची जिल्ह्यात विषारी दारू प्यायल्याने २५ जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ६० हून अधिक जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कल्लाकुरिचीचे जिल्हाधिकारी एमएस प्रशांत यांनी याला दुजोरा दिला आहे. मृतांचा आकडा आणखी वाढू शकतो. कल्लाकुरिचीचे जिल्हाधिकारी एमएस प्रशांत यांनी जिल्ह्यातील सरकारी मेडीकल कॉलेज रुग्णालयात उपचार घेत असलेल्या लोकांची भेट घेतली.
याप्रकरणी के. कन्नुकुट्टी याला अटक करण्यात आली असून त्याच्याकडून जप्त करण्यात आलेल्या सुमारे २०० लीटर अवैध दारूची चाचणी केली असता त्यात प्राणघातक 'मेथनॉल' असल्याचे स्पष्ट झालं आहे. मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी मृत्यूबद्दल दु:ख व्यक्त केलं आणि ते थांबवण्यात अपयशी ठरलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आल्याचं सांगितलं.
स्टॅलिन यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरूल पोस्टमध्ये म्हटलं आहे की, "कल्लाकुरिचीमध्ये भेसळयुक्त दारू पिणाऱ्या लोकांच्या मृत्यूची बातमी ऐकून मला मोठा धक्का बसला आणि दु:ख झालं. या प्रकरणात सहभागी असलेल्यांना अटक करण्यात आली आहे. ते रोखण्यात अपयशी ठरलेल्या अधिकाऱ्यांवरही कारवाई करण्यात आली आहे."
"अशा गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या लोकांची माहिती जनतेने दिल्यास तत्काळ कारवाई केली जाईल. समाजाला उद्ध्वस्त करणाऱ्या अशा गुन्ह्यांना कठोरपणे आळा घालण्यात येईल." तामिळनाडूचे राज्यपाल आरएन रवी यांनी मृतांबद्दल शोक व्यक्त केला आणि उपचार सुरू असलेले लोक लवकरात लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना केली. राज्याच्या विविध भागांतून विषारी दारूच्या सेवनामुळे सातत्याने होणाऱ्या मृत्यूच्या घटनांवर राज्यपालांनी चिंता व्यक्त केली.