डीएमडीके पक्षाचे प्रमुख विजयकांत यांचे गुरुवारी निधन झाले. ते काही दिवसापूर्वी कोरोना पॉझिटिव्ह आले होते. यानंतर त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. कोविड-19 चाचाणी पॉझिटिव्ह आल्यानंतर ते व्हेंटिलेटर सपोर्टवर होते, असं सांगितले जात आहे. मात्र, रुग्णालयाच्या निवेदनात त्यांना न्यूमोनिया झाल्याचे नमूद करण्यात आले आहे.
डीएमडीके पक्षाचे संस्थापक विजयकांत (७१ वर्षे) यांना चेन्नईच्या एमआयओटी हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. येथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या मृत्यूनंतर रुग्णालयाबाहेर सुरक्षा वाढवण्यात आली आहे.
मला पक्षातून काढलंत तर कोरोना काळातील भ्रष्टाचार बाहेर काढेन; भाजप आमदाराची धमकी
DMDK ची स्थापना २००५ मध्ये झाली
अभिनेते विजयकांत यांनी २००५ मध्ये देसिया मुरपोक्कू द्रविड कळघम पार्टीची स्थापना केली. DMDK २०११ ते २०१६ पर्यंत तामिळनाडूमध्ये मुख्य विरोधी पक्ष होता आणि विजयकांत विधानसभेतील विरोधी पक्षनेते होते.
२००६ मध्ये विजयकांत यांच्या पक्ष डीएमडीकेने तामिळनाडूतील सर्व २३४ जागांवर निवडणूक लढवली होती. मात्र विजयकांत एकटेच निवडणूक जिंकण्यात यशस्वी ठरले. उर्वरित सर्व जागांवर त्यांच्या पक्षाच्या उमेदवारांना पराभवाला सामोरे जावे लागले. मात्र, या निवडणुकीत त्यांच्या पक्षाला ८.३८% मते मिळाली.
२००९ च्या लोकसभा निवडणुकीत विजयकांत यांच्या पक्षाबाबतही अशीच परिस्थिती निर्माण झाली होती, जेव्हा पक्षाने राज्यातील ४० लोकसभा जागांपैकी ३९ जागा लढवल्या, पण एकही जागा जिंकली नाही. या दोन्ही निवडणुकांमध्ये विजयकांत यांच्या पक्षाने कोणत्याही पक्षाशी युती केलेली नव्हती. तर २०११ मध्ये विजयकांत यांच्या पक्षाने ४१ जागांवर निवडणूक लढवली आणि २९ जागा जिंकल्या. या निवडणुकीत डीएमडीके हा जयललिता यांच्या पक्षानंतर दुसरा पक्ष म्हणून उदयास आला, विजयकांत विरोधी पक्षनेते बनले. मात्र, त्यानंतर २०१६ आणि २०२१ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांच्या पक्षाला एकही जागा जिंकता आली नाही.