ऑनलाइन लोकमत
चेन्नई, दि. १९ - अन्य राज्यांमध्ये खरा ठरलेला एक्झिट पोलचा अंदाज तामिळनाडूमध्ये मात्र चुकीचा ठरताना दिसत आहे. तामिळनाडूमध्ये जयललिता यांच्या अण्णाद्रमुक पक्षाला १३० पेक्षा जास्त जागांवर आघाडी मिळाली आहे. द्रमुक-काँग्रेस आघाडीने २०११ च्या तुलनेत कामगिरीत सुधारणा केली असली तरी, ते सत्तेपासून दूर राहतील असेच चित्र आहे.
जयललिता सरकारने जनतेसाठी राबवलेल्या विविध कल्याणकारी योजनांना मतदारांनी मतपेटीतून साथ दिली आहे. १९९१ पासून तामिळनाडूमध्ये द्रमुक आणि अण्णाद्रमुक या दोन पक्षांमध्ये सत्तापालट होत राहिला आहे. पण यावेळी प्रथमच जयललिता सत्ता कायम टिकवतील असे दिसत आहे.
जयललिता यांना खराब प्रकृतीमुळे यावेळी फारसा प्रचार करता आला नव्हता तसेच नोव्हेंबरच्या अखेरीस मुसळधार पावासामुळे तामिळनाडूत अनेक भागात पूर आला होता. त्यावेळी जनतेला पुरेशी सरकारी मदत मिळाली नसल्याचा विरोधकांनी आरोप केला होता. या दोन मुद्यांचा जयललिता यांना फटका बसेल अशी शक्यता होती.
Had a telephone conversation with Jayalalithaa ji and congratulated her on her victory. Also conveyed my best wishes to her. @AIADMKOfficial— Narendra Modi (@narendramodi) May 19, 2016
मात्र मतमोजणीच्या आकडेवारीवरुन जयललिता मुख्यमंत्रीपद कायम टिकवतील असे दिसत आहे. विधानसभेतील सध्याच्या आकडेवारीनुसार अण्णाद्रमुकचे १६०, डीएमकेचे २३, काँग्रेसचे पाच, पीएमके दोन आणि डाव्यांचे १८ आमदार आहेत. भाजपने पक्ष विस्तारावर इथे लक्ष केंद्रीत केले होते. पण त्या तुलनेत यश मिळताना दिसत नाहीय.
दोनवर्षांपूर्वी लोकसभा निवडणूकीत जयललिता यांनी क्लीनस्वीप विजयाची नोंद केली होती. त्यावेळी लोकसभेच्या ३९ जागांपैकी जयललिता यांच्या पक्षाने ३७ जागा जिंकल्या होत्या.जयललिता यांच्या निवासस्थानाबाहेर कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरु आहे.