Tamilnadu Cabinet : तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी शनिवारी मंत्रिमंडळ फेरबदलाची घोषणा केली होती. त्यांच्या शिफारशीवरुन राज्यपाल एन रवी यांनी अधिसूचना जारी केली होती. राज्यपालांच्या अधिसूचनेनुसार, रविवारी(दि.29) नवनिर्वाचित मंत्र्यांचा शपथविधी सोहळा पार पडला. यावेळी मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांचे पुत्र आणि मंत्री उदयनिधी स्टॅलिन यांना उपमुख्यमंत्री बनवण्यात आले.
यासह व्ही सेंथिल बालाजी यांनी पुन्हा मंत्रीपदाची शपथ घेतली. व्ही सेंथिल बालाजी यांना अटक झाल्यानंतर त्यांनी राजीनामा दिला होता. त्यांना आता पुन्हा मंत्री करण्यात आले आहे. यासोबतच डॉ. गोवी चेझियान, आर राजेंद्रन आणि एसएम नस्सर यांनीही मंत्रीपदाची शपथ घेतली. राजभवनात झालेल्या शपथविधीला तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम स्टॅलिन यांच्यासह अनेक दिग्गज नेते उपस्थित होते.
उदयनिधी यांना 2019 मध्ये युवा सचिव बनवण्यात आले होते2019 मध्ये उदयनिधी स्टॅलिन यांना युवा सचिव बनवण्यात आले होते. त्यानंतर द्रमुक नेते स्टॅलिन यांनी सुरू केलेल्या पंचायत बैठका त्यांनी जिल्ह्यांमध्ये यशस्वीपणे राबवल्या. याव्यतिरिक्त, त्यांनी 2019 च्या लोकसभा निवडणुकीत द्रमुक उमेदवारांच्या समर्थनार्थ सक्रियपणे प्रचार केला. युवा सचिव म्हणून उदयनिधी स्टॅलिन यांनी विविध आंदोलनांचे नेतृत्व केले. सक्रिय राजकारणाशी संबंधित असलेल्या उदयनिधी स्टॅलिन यांना 2021 च्या विधानसभा निवडणूक लढवण्याची संधी देण्यात आली होती. 2021 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी तिरुवल्लिकनी चेपक्कम मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि प्रचंड विजय मिळवला.
2021 च्या विधानसभा निवडणुकीत AIADMK सरकार कोसळले आणि DMK सरकार सत्तेवर आले. त्यावेळी उदयनिधी स्टॅलिन यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले नव्हते. नंतर 2022 मध्ये मंत्रिमंडळ फेरबदलात उदयनिधी स्टॅलिन यांना यांना युवक कल्याण आणि क्रीडा मंत्री करण्यात आले. यानंतर त्यांना उपमुख्यमंत्री करण्याची मागणी नुकतीच त्यांच्या सहकारी मंत्र्यांकडून करण्यात आली होती. त्यानुसार, मंत्रिमंडळ फेरबदलात त्यांना उपमुख्यमंत्रीपद देण्यात आले आहे.