ऑनलाइन लोकमत
चेन्नई, दि. 15 - तामिळनाडूत राजकीय घडामोडी वेगाने घडत असताना अगोदरच गोत्यात अडकलेल्या अण्णा द्रमुकच्या सरचिटणीस आणि मुख्यमंत्रिपदाच्या दावेदार शशिकला यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. शशिकला यांच्याच पक्षातील आमदार एस सर्वनन यांनी केलेल्या तक्रारीच्या आधारावर शशिकला आणि मुख्यमंत्रीपदाचे प्रबळ दावेदार पलानीसामी यांच्याविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कुवाथूर पोलीस ठाण्यात हा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
अण्णा द्रमुकचे आमदार पन्नीरसेल्वम यांच्या गळाला लागू नये म्हणून शशिकला यांनी आमदारांना एका हॉटेलमध्ये ठेवले होते. सर्वनन तेच आमदार आहेत ज्यांनी शशिकला यांच्यावर रिसॉर्टमध्ये ओलीस ठेवल्याचा आरोप केला होता. संधी मिळाल्यावर सर्वनन यांनी भिंतीवरुन उडी मारुन रिसॉर्टमधून पळ काढला होता. 'मी वेष बदलून, भिंतीवरुन उडी मारुन पळ काढला होता. तिथे असणारे 118 आमदार माझ्या भरवशावर आहेत', असं सर्वनन यांनी सांगितलं.
Tamil Nadu: On complaint of Madurai MLA S Saravanan,kidnapping case filed against #VKSasikala & K Palanisamy in Kuvathur Police Station pic.twitter.com/qxjlWwT1Bd— ANI (@ANI_news) February 15, 2017
व्ही. के. शशिकला यांची आत्मसमर्पण करण्यासाठी मुदत वाढवून देण्याची विनंती करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. तुम्हाला तात्काळ आत्मसमर्पण करण्याचे आदेश देण्यात आले असून, या आदेशात कोणताही बदल केला जाणार नाही असं सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलं आहे. दिलेल्या आदेशातील एकही शब्द बदलण्याचा आमचा विचार नाही असं सांगत सर्वोच्च न्यायालयाने शशिकला यांची तुरुंगवारी अटळ केली आहे.
मुख्यमंत्री होण्यासाठी उतावीळ झालेल्या अण्णा द्रमुकच्या सरचिटणीस शशिकला यांना ६0 कोटी रुपयांच्या बेहिशेबी मालमत्तेच्या खटल्याप्रकरणी मंगळवारी सर्वोच्च न्यायालयाने दोषी ठरवत चार वर्षांची शिक्षा आणि दहा कोटी रुपये दंड सुनावला असून आत्मसर्पण करण्याचा आदेश दिला आहे. शशिकला दोषी ठरल्याने मुख्यमंत्री होण्याचं त्यांचं स्वप्न भंगलं आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे शशिकला मुख्यमंत्री होऊ शकणार नाहीत. पुढील सहा वर्ष शशिकलांना निवडणूक लढवता येणार नाही, तर पुढील दहा वर्ष त्यांना मुख्यमंत्रिपदी विराजमान होता येणार नाही. शशिकला निर्दोष ठरल्या असत्या तर शपथविधीसाठी राज्यपालांनी त्यांना पाचारण करण्याची शक्यता होती.
मात्र अटक होण्याआधी ई. के. पलानीस्वामी यांची विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड करण्यात शशिकला यशस्वी ठरल्या असून, त्यामुळे आता मुख्यमंत्री कोण असेल?, पनीरसेल्वम की पलानीसामी?, असा प्रश्न निर्माण झाला आहे. राज्यपाल विद्यासागर राव यांनी यासंदर्भात कायदेतज्ज्ञ व घटनातज्ज्ञ यांचा सल्ला घेतला आहे. शशिकला यांनी पनीरसेल्वम यांची कोंडी करण्यासाठी त्यांची व १८ नेत्यांची पक्षातून हकालपट्टीही केली. मात्र शशिकला यांना तो अधिकारच नाही आणि पलानीस्वामी यांची निवडही बेकायदा आहे, असे पनीरसेल्वम सांगत आहेत.
जयललितांनी निलंबित केलेल्या पुतण्यांची शशिकलांकडून घरवापसी
जयललिता यांनी पक्षातून निलंबित केलेल्या पुतण्यांना शशिकला यांनी पुन्हा पक्षात प्रवेश दिला असून पक्षाची सुत्रे आपल्याच हाती राहतील याची पुर्ण खबरदारी घेतली आहे. शशिकला यांनी दिनकरन आणि व्यंकटेश ज्यांना 2011 मध्ये जयललितां यांनी पक्षातून निलंबित केलं होतं त्यांची शशिकला यांनी घरवापसी केली असून उप सरचिटणीसपदी नियुक्ती केली आहे.