नवी दिल्ली - देशात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका निर्माण झाला आहे. 50 हजारांहून जास्त नव्या रुग्णांची नोंद झाली असून धडकी भरवणारा ग्राफ समोर आला आहे. गेल्या काही दिवसांपासून देशात पुन्हा एकदा कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. बुधवारी (5 जानेवारी) केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात 24 तासांत कोरोनाचे 58,097 नवे रुग्ण आढळून आले आहेत तर 534 लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या तीन कोटींवर पोहोचली. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा 4,82,551 वर पोहोचला आहे. तामिळनाडूमध्येही सक्रिय रुग्णांची संख्या दहा हजारांच्या पुढे गेली आहे.
कोरोनाचा वाढता धोका पाहता तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन (CM Stalin) हे स्वतः रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळालं आहे. स्टॅलिन यांनी जनजागृती करत लोकांना मास्क वाटले. तसेच लोकांना खबरदारी घेण्याच्या आणि मास्क घालण्याच्या सूचना देखील दिल्या. मुख्यमंत्री मंगळवारी मास्कचे वाटप करण्यासाठी त्यांच्या गाडीमधून खाली उतरले आणि त्यांनी आजूबाजूच्या लोकांना मास्कचे वाटप केले. मुख्यमंत्र्यांनी विशेषत: त्यांचा ताफा अशा ठिकाणी थांबवला जिथे लोक त्यांना मास्कशिवाय दिसत होते. मुख्यमंत्री जात असताना त्यांना रस्त्यात मास्क न घातलेले लोक दिसले. यानंतर मुख्यमंत्र्यांनी त्यांना मास्क घालण्याच्या सूचना दिल्या. सोशल मीडियावर याचा एक व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे.
मुख्यमंत्र्यांनी कोरोनाच्या धोक्याबाबत दिला इशारा
लोकांना मास्कचे वाटप करताना मुख्यमंत्र्यांनी त्यांना कोरोनाच्या धोक्याबाबत इशारा दिला. यावेळी मुख्यमंत्री स्टॅलिन यांच्यासोबत राज्याचे आरोग्य मंत्री एमए सुब्रमण्यमही उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांनी त्यांचे वाहन थांबवून मुले व महिलांना मास्कचे वाटप केले. मास्कचे वाटप केल्यानंतर ते लॉकडाऊनबाबत निर्णय घेण्यासाठी आरोग्य अधिकाऱ्यांसमवेत आढावा बैठकीला उपस्थित राहण्यासाठी निघाले. सोमवारी चेन्नईमध्ये करोनाच्या 1728 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे, त्यानंतर राज्यातील सक्रिय रुग्णांची संख्या 10 हजारांच्या पुढे गेली आहे. सध्या तामिळनाडूत 10,364 कोविड रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या 36,796 वर
चेन्नईत एकूण सक्रिय रुग्णांची संख्या 4,259 झाली आहे. तसेच अनेक दिवसांनंतर, कोईम्बतूरमध्ये कोरोनाच्या दैनंदिन रुग्णांची संख्या 100 च्या पुढे गेली आहे आणि नवीन रुग्णांची संख्या 105 वर पोहोचली आहे. तिरुपूरमध्ये 52, तर कन्याकुमारीमध्ये 47 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तामिळनाडूमध्ये कोरोनाच्या एकूण रुग्णांची संख्या 27,52,856 वर पोहोचली आहे. त्याच वेळी, संसर्गामुळे आणखी सहा जणांचा मृत्यू झाला, त्यानंतर राज्यातील कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या 36,796 झाली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.