डीएमके नेते आणि तामिळनाडूचे ऊर्जामंत्री सेंथिल बालाजी यांच्या घरावर ईडीने छापा टाकल्यानंतर बुधवारी त्यांना अटक करण्यात आली. ईडीच्या कारवाईदरम्यान सेंथिल बालाजी यांनी छातीत दुखत असल्याची तक्रार केली होती. यानंतर त्यांना ओमंडुरार येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सेंथिल बालाजी यांच्या चेन्नई येथे असलेल्या घराशिवाय त्यांच्या करूर येथील वडिलोपार्जित घरावरही छापे टाकण्यात आले.
ज्या वेळी तपास यंत्रणेने सेंथिल बालाजी यांच्या ठिकाणांवर छापे टाकले, त्यावेळी ते मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडले होते. छाप्याची माहिती मिळताच ते टॅक्सी घेऊन त्वरित घरी पोहोचले. सेंथिल यांच्या अटकेनंतर डीएमकेही त्वरित सक्रिय झाली. त्यांची अटक घटनाबाह्य असल्याचं सांगत पक्षानं कायदेशीर लढाई लढणार असल्याचं वक्तव्य केलं. तसंच यावेळी त्यांनी भाजपवर टीका केली. पक्ष भाजपच्या धमकीच्या राजकारणाला घाबरत नसल्याचंही डीएमकेनं म्हटलं.
रुग्णालयाबाहेर आंदोलनसेंथिल यांना रुग्णालयात आणल्यानंतर त्या ठिकाणीही मोठा ड्रामा पाहायला मिळाला. ईडीच्या कारवाईनंतर सेंथिल यांनी छातीत दुखत असल्याची तक्रार केली, तेव्हा त्यांना रुग्णालयात आणण्यात आलं. यादरम्यान, त्यांच्या समर्थकांनी रुग्णालयाच्य बाहेर एकत्र येत आंदोलन केलं.
आयकर विभागानंही टाकला होता छापादरम्यान, राज्याचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी आपल्या घरी ज्येष्ठ मंत्र्यांची बैठक बोलावली आहे. या विषयावर स्टॅलिन कायदेशीर सल्लाही घेणार आहेत. सेंथिल यांच्या अटकेनंतर राज्यसभा खासदार एनआर एलांगो यांचंही वक्तव्य समोर आलंय. काही काळापूर्वी आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी सेंथिल यांच्या घरावर छापा टाकला होता.
सर्वोच्च न्यायालयानं गेल्या महिन्यात सेंथिल यांच्याविरुद्धच्या कथित रोख रकमेच्या घोटाळ्यात पोलीस आणि ईडीच्या तपासाला परवानगी दिली होती. हे प्रकरण २०१४ मधील आहे, जेव्हा सेंथिल अन्नाद्रमुक सरकारमध्ये परिवहन मंत्री होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्यावर मनी लाँड्रिंग अंतर्गत छापे टाकण्यात येत आहेत.