तामिळनाडूत हत्ती आणि माणसं यांच्यातला संघर्ष काही नवा नाही. काही महिन्यांपूर्वी मानवी वस्तीत घुसलेल्या गर्भवती हत्तीणीला ज्वलंत स्फोटक खायला दिल्याच्या प्रकारानं देशाला हादरवून सोडलं होतं. माणूसकीला काळीमा फासणाऱ्या या कृतीनं गर्भवती हत्तीणीचा तडफडून मृत्यू झाला होता. आता असाच एक हृदयद्रावक प्रकार समोर आला आहे. दोन दिवसांपूर्वी ४० वर्षीय हत्ती तामिळनाडूतील एका वस्तीत घुसला आणि त्याला पळवून लावण्यासाठी लोकांनी त्याच्या अंगावर जळतं टायर फेकला. तो टायर हत्तीच्या कानात अडकला आणि त्यामुळे त्याचं डोकं भाजलं. थेप्पाकडू येथील कॅम्पमध्ये हत्तीवर उपचार सुरू होते, परंतु हत्तीचा दुर्देवी मृत्यू झाला
हत्तीच्या अंगावर पेट घेतलेला टायर फेकल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. निलगीरी येथील मसिनागुडी या प्रसिद्ध पर्यटन ठिकाणातील ही घटना आहे. अन्नाच्या शोधात हा हत्ती मानवी वस्तीत आला होता. ही घटना दोन महिन्यांपूर्वीची असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत होता. हत्तीच्या पाठीवर अनेक दुखापती झाल्या होत्या आणि त्याच्या कानाजवळचा भाग जळाला होता, असे शवविच्छेदन अहवालातून समोर आले होते. पण, ही घटना दोन आठवड्यांपूर्वीची असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या प्रकरणी तीन आरोपींवर गुन्हा दाखल केला गेला आहे.