चेन्नई : अण्णा द्रमुकच्या पनीरसेल्वम आणि पलानीस्वामी या दोन गटांचे विलीनीकरण झाल्यापासून २४ तासांच्या आत त्या पक्षाचे तामिळनाडूमधील सरकार अल्पमतात आले आहे. सहचिटणीसपदावरून काढण्यात आलेले दिनकरन यांनी बंडाचा झेंडा उभारला असून, त्यांच्यामागे तब्बल २२ आमदार असल्याचे स्पष्ट झाले आहे. दिनकरन हे शशिकला यांचे भाचे आहेत.दिनकरन यांना आणखी १0 आमदार पाठिंबा देतील, अशी शक्यता आहे. त्यामुळे पक्षाचे बहुमत संपुष्टात आले आहे. दिनकरन यांनी १९ आमदारांना पुडुच्चेरीमधील रिसॉर्टमध्ये पाठविले आहे. आमदार फुटू नयेत, यासाठी ही काळजी घेण्यात आली आहे.सरकार अल्पमतात आले असले तरी त्याविरोधात अविश्वास ठराव आणणे द्रमुकला शक्य होणार नाही, कारण दोन अविश्वास ठरावांमध्ये किमान ६ महिन्यांचे अंतर असावे लागते. आधीचा ठराव एप्रिलमध्ये आणण्यात आला होता. तो फेटाळला गेला. परिणामी, आॅक्टोबरपर्यंत पुन्हा ठराव येऊ शकणार नाही.बहुमत सिद्ध करण्याची मागणी...तामिळनाडू विधानसभेतील २३३ सदस्यांपैकी अण्णा द्रमुककडे १३३ आमदार होते. त्यातील २२ आमदार दिनकरन यांना जाऊ न मिळाल्याने, पक्षाकडे केवळ १११ आमदार राहिले आहेत. बहुमतासाठी ११७ आमदार असणे गरजेचे आहे.बहुमत सिद्ध करण्यास सांगावे, अशी मागणी द्रमुकचे नेते स्टॅलिन यांनी केली आहे. अण्णा द्रमुकचे दोन्ही गट एकत्र यावेत, यासाठी भाजपा व केंद्र सरकारने प्रयत्न केले़ राज्यपाल विद्यासागर राव काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
तामिळनाडू सरकार आले अल्पमतात; दिनकरन यांचे बंड, २२ आमदारांचा पाठिंबा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2017 12:40 AM