चेन्नई - भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या मारेकऱ्यांची सुटका करण्यात यावी. यासाठी तामिळनाडूमधील सत्ताधारी एआयएडीएमके पक्षाच्या सरकारकडून राज्यपालांकडे शिफारस करण्यात येणार आहे. याबाबतचा निर्णय तामिळनाडू सरकारने घेतला असून, राजीव गांधी यांच्या सर्व सात मारेकऱ्यांना मुक्त करण्यासाठी राज्यपाल बनवारीलाल पुरेहित यांच्याकडे शिफारस करण्यात येणार आहे.
राजीव गांधी यांच्या मारेकऱ्यांची मुक्तता करण्याच्या निर्णयास याआधी केंद्र सरकारकडून विरोध करण्यात आला होता. दरम्यान, तामिळनाडू सरकारमधील मंत्री डी. जयकुमार यांनी सांगितले की, राजीव गांधी यांच्या हत्येप्रकरणी दोषी ठरलेल्या मारेकऱ्यांची मुक्तता करण्यासाठी राज्यपालांकडे शिफारस करण्यात यावी, असा निर्णय मुख्यमंत्री पलानीसामी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कॅबिनेटच्या बैठकीत घेण्यात आला.
काही काळापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने राजीव गांधी यांच्या हत्येमधील दोषी आरोपी ए.जी. पेरारीवलन याच्या दया याचिकेवर विचार करण्याचे निर्देष राज्यपालांना दिले होते. केंद्र सरकारच्या एका याचिकेवर सुनावणी करताना न्यायमूर्ती रंजन गोगोई, नवीन सिन्हा आणि के. एम. जोसेफ यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला होता.